गोमंतक भंडारी समाजाचे 2021-23 चे निर्णय चुकीचे
उत्तर गोवा जिल्हा निबंधकांचा निवाडा : प्रशासक नेमण्याची मागणी फेटाळली
पणजी : गोमंतक भंडारी समाज समितीचा वाढवण्यात आलेला 5 वर्षाचा कार्यकाळ आणि त्यास देण्यात आलेली संमती, घेण्यात आलेली आमसभा इत्यादी वर्ष 2021 ते 2023 मध्ये जे काही करण्यात आले ते चुकीचे आणि घटनाबाह्य होते, असा निवाडा उत्तर गोवा जिल्हा निबंधकांनी दिला आहे. त्यामुळे अलिकडेच नव्याने निवडण्यात आलेली समिती बेकायदेशीर ठरल्याचा दावा विरोधी गटाने व त्या गटाच्या वकिलांनी केला आहे. नवीन समितीच्या विरोधात तक्रार करण्याची मोकळीक विरोधी गटाला देण्यात आली असून तशी तक्रार करणार अशी माहिती विरोधी गटाच्या वकिलांनी दिली. त्यामुळे भंडारी समाजाच्या निवडणुकीतून निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला नसल्याचे समोर आले आहे. विरोधी गट आणि त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, निबंधकांचा निवाडा आपल्या बाजूने झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 2021 मध्ये जी आमसभा घेण्यात आली ती चुकीची होती तसेच 2023 मध्ये आमसभा घेतली आणि त्यात कार्यकाळाच्या नियमात दुरुस्ती करुन तीन वर्षाचा कार्यकाळ पाच वर्षे करण्यात आला ते सुद्धा अवैध ठरवले आहे. त्यामुळे पाच वर्षासाठी निवडलेली आताची समिती बेकायदेशीर ठरते, असे विरोधी गटातर्फे नमूद करण्यात आले.
नवीन समिती कायदेशीर की बेकायदेशीर?
भंडारी समाजावर प्रशासक नेमण्याची विरोधी गटाची मागणी निबंधकांनी फेटाळून लावली आहे. नवीन समिती कायदेशीर आहे की नाही? याबाबत निबंधकांनी कोणताही निवाडा दिलेला नाही. आता नव्याने तक्रार आल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन नवीन समितीचे भवितव्य ठरणार आहे.