गोल्फपटू अदिती, दीक्षा पॅरिस ऑलिम्पिक सहभागासाठी सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय गोल्फपटू अदिती अशोक आणि दीक्षा डागर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत, तर शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर यांनाही या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याची खूप संधी आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची अदितीची ही तिसरी खेप असेल, जी भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे. तर दीक्षा दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. शर्मा आणि भुल्लरसाठी हा त्यांचा ऑलिम्पिकमधील पहिलाच सहभाग असेल.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदिती चौथ्या स्थानावर राहिली. ही ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका भारतीय गोल्फ संघाकडून पाठवल्या जातात. ऑलिम्पिकसाठी पात्रता अधिकृत जागतिक गोल्फ क्रमवारीनुसार ठरते. त्यातील अव्वल 15 खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात. ज्यात एका देशातून जास्तीत जास्त चार गोल्फर्सना अनुमती दिली जाते. पहिल्या 15 खेळाडूंनंतर ऑलिम्पिक गोल्फ क्रमवारीत प्रत्येक देशामधील दोन सर्वोच्च पात्र खेळाडूंचा समावेश राहतो. मात्र सदर देशातील किमान दोन गोल्फर पहिल्या 15 मध्ये नसल्यास हा लाभ मिळतो.
दरम्यान, पीजीए टूरवर सध्या ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे ते दोन भारतीय-अमेरिकन सहित थिगला आणि अक्षय भाटिया हे दोघेही या आठवड्यात कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत. यंदाचे दुसरे उपविजेतेपद मिळविलेला थिगला आणि दुसरे पीजीए टूर विजेतेपद जिंकणारा आणि मास्टर्ससाठी पात्र ठरलेला भाटिया हे आता अनुक्रमे 12 व्या आणि 33 व्या क्रमांकावर आहेत. तथापि, थिगला किंवा भाटिया या दोघांनाही ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळण्याची शक्यता नाही. कारण जागतिक क्रमवारीत अव्वल 15 मध्ये तब्बल आठ अमेरिकन आहेत.