महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिकर्व्हमध्ये महाराष्ट्राला सोनेरी यश

06:12 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिरंदाजी महिला संघाला कांस्य : कबड्डीत पुरुष संघ उपांत्य फेरीत

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी, /पणजी

Advertisement

महाराष्ट्राच्या महिला संघाने सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशवर 32-22 असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डी संघाचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राने पहिल्या लढतीत हिमाचल प्रदेशकडून पराभव पत्करला. मग दुसऱ्या सामन्यात राजस्थानशी बरोबरी झाली. तीच महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरली.

अपेक्षा टाकळेचा अपेक्षेनुसार बहरलेला चढायांचा खेळ, त्याला युवा चढाईपटू हरजित कौरच्या धडाकेबाज चढायांची लाभलेली साथ आणि अंकिता जगतापच्या दिमाखदार पकडी या बळावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला.

महाराष्ट्राच्या महिला संघाला प्रारंभीची तीन मिनिटे उत्तर प्रदेशने चांगली लढत दिली. पण हरजीत आणि अपेक्षा यांनी गुणांचा सपाटा लावल्यामुळे उत्तरेचा बचाव निरुत्तर झाला. 11व्या मिनिटाला महाराष्ट्राने पहिला लोण चढवला. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस महाराष्ट्राकडे 21-12 अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राने सामन्यावरील पकड सुटू दिली नाही.

पुरुष संघ उपांत्य फेरीत; चंडीगडचा धुव्वा

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अखेरच्या साखळी लढतीत चंडीगढचा 42-18 असा धुव्वा उडवला. पंजाब, तामिळनाडू यांना पहिल्या दोन सामन्यांत हरवणाऱ्या महाराष्ट्राने तीन विजयांसह गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा मंगळवारी उपांत्य सामना हरयाणा संघाशी होणार आहे.

रीकर्व्हमध्ये पुरुष संघाला सोनेरी यश; महिला संघाला कांस्यपदक

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सोमवारी रीकर्व्ह तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिला संघाने कांस्यपदक प्राप्त केले. पुरुष गटाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडवर 6-2 असा शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघात सुमेध मोहोड, सुखमणी बाबरेकर, यशदीप भोगे, गौरव लांबे यांचा समावेश होता. महिला गटाच्या कांस्यपदकाच्या रोमहर्षक सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूवर 5-4 असा निसटता विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघात मंजिरी अलोने, शर्वरी शेंडे, श्रुष्टी जोगदंड, नक्षत्रा खोडे यांचा समावेश होता. हरयाणाला सुवर्ण आणि झारखंडने कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.

दत्तू भोकनळचे सुवर्णपदक हुकले; निकिता दरेकरला कांस्यपदक

शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या नौकानयनच्या कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महाराष्ट्राचा नौकानयनपटू दत्तू भोकनळचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याने रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वत:चे दुसरे रौप्यपदक नोंदवले. महिलांमध्ये पुण्याची खेळाडू निकिता दरेकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नौकानयनमध्ये सोमवारी महाराष्ट्राने एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके पटकावली.

कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत खेळाडूंना धावत जाऊन वजनाने जाड असलेल्या बोटीमध्ये बसत समुद्रात 500 मीटर नौकानयन करायचे असते. ही शर्यत दत्तूने 2 मिनिटे, 33.6 सेकंदांत पार केली तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या सेनादलाच्या सलमान खानने हे अंतर 2 मिनिटे, 33.5 सेकंदांत पार केले. दत्तूने याआधी या स्पर्धेतील नदीत झालेल्या सिंगल्स स्कल विभागात रौप्यपदक मिळवले होते. आतापर्यंत त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात 11 सुवर्ण व 2 रौप्य अशी 13 पदके जिंकली आहेत. तसेच कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महिलांच्या विभागात निकिताने कांस्यपदक मिळवताना 3 मिनिटे, 6.8 सेकंद वेळ नोंदवली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article