महाराष्ट्राच्या पदकांचा सुवर्णमहोत्सव
7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार 2025 : सिद्धेश घोरपडेची पदक हॅट्ट्रिक : टेबल टेनिसमध्ये दुहेरी सुवर्ण कामगिरी
वृत्तसंस्था/गया, बिहार
पदक तक्यात अव्वल स्थान कायम राखत महाराष्ट्राने 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत गुरुवारी 51 पदकांचा पल्ला पार करत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. टेबलटेनिस दुहेरीत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राच्या मुलींनी स्पर्धेतील 50 वे पदक जिंकले. त्यापूर्वी पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. खेलो इंडिया स्पर्धेत सर्वप्रथम पदकांचे अर्धशतक झळकविण्याची हॅट्ट्रिक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी 20 सुवर्ण, 16 रौप्य व 15 कांस्यपदकांची लयलूट करून महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम राखले होते. आज संपलेल्या सायकलिंग, मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राने सुवर्ण सांगता केली. दिल्लीत संपलेल्या सायकलिंग स्पर्धेत 3 सुवर्ण 2 रौप्य व 1 कांस्य पदकाची लयतूट करीत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. गयातील मल्लखांब स्पर्धेत 2 सुवर्ण 5 रौप्य व 2 कांस्य अशी 9 पदके महाराष्ट्राने कमवून उपविजेतेपदावर नाव कोरले. जलतरणात सर्वाधिक 19 पदके महाराष्ट्राने जिंकली आहे. आर्चरीतील 6 सुवर्णासह 9 पदकांचा विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.
टेटेमध्ये दुहेरी सुवर्ण
नव्याने उभारण्यात आलेल्या राजगीर क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दुहेरीत सुवर्ण पदक जिंकून टेबलटेनिसमधील पदकाचे खाते उघडले. महाराष्ट्राच्या काव्या भट व दिव्याश्री भौमिकने पश्चिम बंगालच्या अविशा कर्माकर व शुभाक्रिता दत्तचा 11-6, 11-9,11-7 गेमने पराभव करीत पर्दापणातच सुवर्ण यशाला गवसणी घातली.
नेमबाजीत शांभवी क्षीरसागरचे सोनेरी यश
पुण्याच्या शांभवी क्षीरसागर हिने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतील 10 मीटर एअर रायफलमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. गतस्पर्धेत रिकाम्या हाताने परतलेल्या शांभवीने यावेळी मात्र, सुवर्णवेध साधला. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर शांभवी क्षीरसागरने यावेळी अतिशय शांत चित्ताने खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत परफेक्ट टेन लावणारी ती एकमेव नेमबाज ठरली. शांभवीने सर्वाधिक 251.3 गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पंजाबच्या लावण्या रावत हिनेही शांभवीला तुल्यबळ लढत दिली. मात्र, 249.6 गुणांसह तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकची हृदया कोंडूर 228.8 गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
दोरीच्या मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
गया : आर्या साळुंखे आणि तनश्री जाधव या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज मल्लखांब या देशी खेळातील दोरीच्या मल्लखांबमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके जिंकून दुहेरी धमाका केली. स्पर्धेत आर्याने 1 सुवर्ण, 2 रौप्यांसह पदकासह हॅट्ट्रिक तर तनश्रीने 3 रौप्य, 1 कांस्यासह पदकांचा चौकार झळकावला. मुलींच्या विभागातील दोरीच्या मल्लखांब प्रकारात आर्या साळुंखे आणि तनश्री जाधव मराठमोळ्या सहकाऱ्यांमध्येच सुवर्णपदकासाठी रस्सीखेच रंगली होती. यात अखेर साताऱ्याच्या आर्या साळुंखेने 8.70 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तनश्रीला 8.65 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुदुचेरीच्या ओविया राजा हिने 8.50 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
सायकलिंगमध्ये सिद्धेशचा वरचष्मा
सायकलिंगमध्ये पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या दिवशी मराठमोळ्या सिद्धेशने केरिन रेसमध्ये बाजी मारत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली. झारखंडचा बिकाश ओरेन रौप्य पदकांचा मानकरी ठरला, तर तेलंगणाच्या थानिश कुमार सिंगला कांस्यपदक मिळाले. नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही ट्रॅक सायकलिंग स्पर्धा पार पडली. सिद्धेश घोरपडेने पहिल्या दिवशी स्क्रॅचरेस इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकत आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. मग दुसऱ्या दिवशी त्याने ट्रॅक सायकलिंगच्या इंडिव्हिजल परशूट प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आज त्याने पुन्हा एकदा सोनेरी यशाने मोहिमेची सांगता केली.