Solapur Crime : सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये चक्क करोडोंचे सोने गायब!
सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या मालाची चोरी
सोलापूर : सोलापूर -मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये तब्बल ५ ते ५.५ कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने गायब झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे-कल्याणदरम्यान झालेल्या या चोरीमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या घाऊक व्यापारात असलेले अक्षय जैन हे ७ डिसेंबर रोजी सोलापूर-दादर या मार्गावर सिद्धेश्वर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२११६) मधील A1/49 या सीटवरून प्रवास करत होते. त्यांचा PNR: 8927244236 असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जैन यांनी ऑन-ड्यूटी टीटीई विक्रांत मीणा (सोलापूर मुख्यालय) यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते सोलापूरमध्ये व्यापाराच्या कामानिमित्त आले होते.
परतीच्या प्रवासात त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. एकामध्ये सुमारे ५ किलो सोने, तर दुसरीत कपडे. मात्र पुणे-कल्याण या दरम्यान त्यांची दोन्ही बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात आले. कल्याण स्थानक पार झाल्यानंतर झोपेतून उठल्यावर बॅगेतील सोने चोरीचा गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ त्यांनी टीटीईकडे लिखित स्वरूपात तक्रार नोंदवली. पाच कोटींच्या सोन्याचा माल रेल्वेतून प्रवास करत असताना सुरक्षेची कोणतीही सोय न करणे, तसेच इतक्या मोठ्या चोरीची प्रवासादरम्यान कोणालाही चाहूल न लागणे, हे गंभीर मानले जात आहे.
यामुळे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडे पोचवण्यात आली असून सोलापूर विभाग तसेच सोलापूर, पुणे, कल्याण आरपीएफ-जीआरपीकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रवाशांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लाखो रुपयांचा माल घेऊन प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.