सोने चोरीतील दोघांना अटक! स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई: तीन दिवस पोलीस कोठडी
आटपाडीसह संपुर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या सुमारे 20 किलो सोने चोरीप्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प.बंगाल येथुन अटक केली. स्वरूप गोपाल दास आणि विश्वनाथ गोपाल दास असे अटक केलेल्यांची नावे असुन त्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोन्याचे दागिने बनवुन देणाऱ्या बंगाली कारागिर गौतम दास आणि त्याच्या कुटुंबियांनी सुमारे 20 किलो सोने घेवुन पोबारा केल्याचा प्रकार आठ दिवसापुर्वी घडला. याप्रकरणी आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडीमध्ये तब्बल पंचवीस ते तीस वर्षांपासुन सोन्याचे दागिने बनविण्याचे काम गौतम गोपाल दास(मुळ रा.गोपालनगर दक्षिणपाडा, जि.पुर्व मिदनापुर प.बंगाल) व सहकारी करत होते.
सराफ, गलाई व्यवसायिकांचा विश्वास त्याने संपादीत केला होता. गत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तो आणि त्याचे कुटुंबिय आटपाडीतुन गायब झाले. त्याने आपली फसवणुक करून पळुन गेल्याचे कळाल्यानंतर सराफांमध्ये खळबळ माजली. प्रसाद जवळे, संदिप जाधव, सचिन काटकर, नानासो बोधगिरे, प्रमोद भोसले, सुरेश चव्हाण, शंकर चव्हाण, बाळासाहेब गिड्डे, मोहन गिड्डे, शशिकांत जाधव, राहुल व्हनमाने यांच्यासह अनेकांची फसवणुक झाल्याचे पोलीस तक्रारीत नमुद करण्यात आले.
सोन्यासह रोख रक्कमेचा चुना लावुन गौतम दास आणि त्याच्या कुटुंबियांनी पलायन केल्यानंतर पोलीसांकडुन त्याच्या तपासाला गती देण्यात आली. प.बंगाल येथुन स्थानिक गुन्हे अन्वेषणने मुख्य आरोपी गौतमचा भाऊ स्वरूप गोपाल दास आणि विश्वनाथ गोपाल दास यांना अटक केली. अटक केलेल्या दोघांनाही शुक्रवारी आटपाडी न्यायालयात हजर केले असते 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कोट्यावधींचा गंडा घालुन पळुन गेलेला गौतम मात्र पोलीसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेची प्रतिक्षा फसवणुक झालेल्यांना आहे. शिवाय प.बंगालमध्ये गेलेले पोलीस मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहचले कसे नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. सुमारे 20 किलोपेक्षा अधिकचे सोने घेवुन पोबारा केलेल्या गौतमच्या अटकेबाबत व्यापाऱ्यांना प्रतिक्षा लागलेली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करत आहेत.
सोन्यासह रोख रक्कमेचा गंडा घालणाऱ्या गौतमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अटकेची बातमी आटपाडीत वाऱ्यासारखी पसरली. व्यापारी पेठेत मुख्य सुत्रधार गौतमची पत्नी, मुलगी आणि भाऊ पोलीसांच्या हाती लागल्याच्या बातम्या पसरल्या. होत्या. परंतु प्रत्यक्षात स्वरूप आणि विश्वनाथ दास हे दोन आरोपी पोलीसांच्या हाती लागले असुन उर्वरीत तपासाकडे नजरा लागल्या आहेत.