सोन्याच्या दरात 4 महिन्यात 25 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2025 मधील पहिल्या 4 महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शीयल सर्व्हिसेस यांच्या अहवालानुसार सोन्याच्या दरात चार महिन्यात 25 टक्के इतकी वाढ झाली आहे. एमसीएक्स आणि सीओएमइएक्स या एक्सचेंजवर सोन्याच्या दराने सर्वकालीक उच्चांक गाठला आहे. तर चांदीने आतापर्यंत वर्षाच्या आधारावर पाहता 15 टक्के इतका परतावा देण्यात यश मिळवलं आहे.
सोन्याच्या किमतीने मात्र कमालीची वाढ नेंदवली आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार कर युद्ध, कमकुवत डॉलर आणि आर्थिक सुस्ती यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 हून अधिक देशांना लक्ष्य करत व्यापार शुल्क आकारले आहे. चीनवरील आयात शुल्क वाढीवरुन दोन्ही देशात तणावाचे वातावरण दिसते आहे. टॅरिफ वॉरने जागतिक मंदीची चिन्हे तरळू लागली असून आर्थिक सुस्तीची शक्यता डोकावताना दिसते आहे. यातूनच सोने हे एक आकर्षक पर्याय म्हणून खरेदी केले जात आहे. कमकुवत डॉलर व केंद्रीय बँकेकडून खरेदी केले जात असल्याने सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे. अमेरिकन डॉलर इतर जगाच्या प्रमुख चलनाच्या तुलनेत 7 टक्के इतका घसरला आहे. यात चीनमधील केंद्रीय बँक सोने साठवण्याच्या प्रयत्नात आहे.
सोन्याच्या आयातीत 192 टक्के वाढ
याचदरम्यान जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याची आयात 192 टक्के इतकी वाढली असल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.
टॅरिफ युद्धाच्या कारणास्तव जगभर अनिश्चितता दिसून आली असून यादरम्यान देशातील सोन्याची आयात मार्चमध्ये 192 अधिक वाढलेली दिसली आहे. यासह सोन्याची आयात 4.47 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. फेब्रुवारी महिन्यात यात 62 टक्के इतकी घसरण दिसून आली होती. पण जानेवारी 2025 आणि डिसेंबर 2024 महिन्यात अनुक्रमे 40 टक्के, 55 टक्के इतकी आयातीत वाढ झाली होती. पण चांदीची आयात मात्र 85 टक्के मार्चमध्ये घसरत 11.93 कोटी डॉलरवर राहिली होती. एकंदर आयातीत सोन्याची हिस्सेदारी 8 टक्के इतकी आहे.
सोमवारी सोने पोहचले 96,696 रुपयांवर
सोन्याचा दर यावर्षी सातत्याने विक्रमी स्तरावर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी वायदा बाजारात सोन्याचा भाव 3397 डॉलरवर विक्रमी स्तरावर पोहचला होता. देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या भावाने 96,747 रुपयांचा सर्वोच्च स्तर गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 1443 रुपयांनी वाढत 96,696 रुपयांवर पोहचला. चांदीचा भाव 563 रुपयांच्या वाढीसह 95,600 रुपयांवर पोहचला होता.