दिपिका कुमारीला दोन सुवर्णपदके
फोंडा : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजी खेळात रिकर्व्ह प्रकारात महिला गटात जागतिक क्रमवारीत दुसरे मानांकन असलेल्या झारखंडच्या दिपिका कुमारी तर पुरुष गटात आसामच्या मुकेश बोरोने सुवर्णपदक पटकावले. पुरुष सांघिक गटात महाराष्ट्रने तर महिला गटात हरियाणा संघाने तसेच मिश्र गटात झारखंडने सुवर्णपदक पटकावले. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेचा काल शेवटचा दिवस होता. महिला वैयक्तीक गटात हरियाणाच्या संगिताने रौप्य तर तमन्नाने कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात उत्तराखंडच्या कार्तिक राणाने रौप्य तर सेनादलच्या गोरा हो यांनी कांस्यपदक प्राप्त केले. पुरुषांच्या सांघिक गटात महाराष्ट्रच्या यशदिप भोगे, सुमेध माहोद, शुकमणी बाबरेकर व गौरव लांबे यांनी सुवर्ण, झारखंडच्या म्रीनल चौहान, गोल्डी मिश्रा, श्रेय भारद्वाज व गुरुशरण बेसरा यांनी रौप्य तर सेनादलच्या इंद्र स्वामी, गोरा हो, सुखचेन सिंग व सनी कुमार यांनी कांस्यपदक पटकावले. महिला सांघिक गटात हरियाणाच्या संगिता, रिद्धी, तमन्ना व तनिशा वर्मा यांनी सुवर्ण, झारखंडच्या दिपिका कुमारी, दिप्ती कुमारी, कोमालिका बारी व अग्नी कुमारी यांनी रौप्य तर महाराष्ट्रच्या शार्वरी शेंडे, श्रृष्टी जोगदंड, मंजिरी आलोने व नक्षत्रा खोडे यांनी कांस्यपदक मिळविले. मिश्र गटात झारखंडच्या म्रीनल चौहान व दिपिका कुमारी यांनी सुवर्ण, आसामच्या जयंत तालुकदार व हिमानी बोरो यांनी रौप्य तर उत्तरप्रदेशच्या रोहित कुमार व अमिषा चौरासिया यांनी कांस्यपदक पटकावले.