For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला तिरंदाज शीतल देवीला सुवर्णपदक

06:43 AM Sep 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
महिला तिरंदाज शीतल देवीला सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था / ग्वेंगजू (द. कोरिया)

Advertisement

येथे सुरू असलेल्या पॅरा विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात महिलांच्या विभागात भारताची 18 वर्षीय बाहूविहीन (आर्मलेस) शीतलदेवीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर पुरूषांच्या विभागात या क्रीडा प्रकारात भारताच्या तोमन कुमारने सुवर्णपदक मिळविले. शीतलदेवी आणि सरिता यांनी महिलांच्या खुल्या सांघिक कंपाऊंड प्रकारात रौप्य पदक मिळविले.

या स्पर्धेत शनिवारी भारताचे दोन तिरंदाजपटू विश्वचॅम्पियन ठरले. भारताने या स्पर्धेत एकूण 5 पदकांची कमाई केली आहे. बाहूविहीन असताना या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी शीतलदेवीने नवा इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारी ती भारताची पहिली तिरंदाजपटू आहे. महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात शीतलदेवीने अंतिम लढतीत तुर्कीच्या टॉपसिडेड ओझनूर गिर्डीचा 146-143 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. जम्मू काश्मीरच्या शीतलदेवीने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. यापूर्वी म्हणजे 2022 साली अमेरिकेच्या मॅट स्टुझमनने बाहूविहीन असतानाही तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.

Advertisement

या स्पर्धेत शीतलदेवीने सरिता समवेत महिलांच्या कंपाऊंड खुल्या सांघिक तिरंदाजी प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. शीतल आणि सरिता या भारतीय महिला तिरंदाजपटूंना अंतिम लढतीत तुर्कीच्या गिर्डी आणि बुरसा फेतमा युन यांच्याकडून 37-38 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. शीतलदेवीने आणि सरिता यांचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. पुरूषांच्या खुल्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात कांस्यपदकासाठीच्या लढतीमध्ये ब्रिटनच्या मॅक्विनने भारताच्या शामसुंदर स्वामीचा 148-141 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.