घरातून 4 लाखाचे सोन्याचे दागिने लांबवले
लांजा :
घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले व वापरत असलेले असे एकूण 4 लाख 17 हजार ऊपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सासूने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लांजा तालुक्यातील पुनस सावंतवाडी येथे घडली.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सविता विलास सावंत (68, रा. पुनस सावंतवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. त्यांची सून दुर्वा विजेश सावंत (30, रा. पुनस-सावंतवाडी तर सध्या रा. देवऊख वरची आळी) हिने 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 सप्टेंबर या कालावधीत आपल्या पुनस येथील राहत्या घराच्या कपाटाच्या लॉकरमधून 2 लाख 21 हजार ऊपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या चेन, 1 लाख 40 हजार ऊपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाच्या साखळी टाईप डिझाईन केलेले सोन्याचे ब्रेसलेट, 21 हजार ऊपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची अंगठी आणि 35 हजार ऊपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण 4 लाख 17 हजार ऊपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल तसेच अंगावर वापरत असलेले दागिने सासू सविता सावंत हिच्या संमतीशिवाय चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सासू सविता सावंतने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लांजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ) प्रमाणे सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करीत आहेत.