सोन्याची स्वस्ताई ‘सोने पे सुहागा’!
सोने-चांदीच्या दरांमधील घसरण ग्राहकांच्या पथ्थ्यावर
पणजी : शुभ मुहूर्तांचे शुभ दिवस असलेल्या दसरा, दिवाळी, धनत्रयोदशी, पाडवा, अक्षयतृतीया यासारख्या सणांच्या निमित्ताने सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्याची फार जुनी परंपरा आपल्या भारत देशात आणि गोव्यातही आहे. परंतु हल्लीच्या काही वर्षांमध्ये सोन्या चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढच होत असल्याने या वस्तुंची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचू लागली आहे. सोने सव्वा ते दीड लाखांच्या टप्प्यात पोहोचले असल्याने मध्यमवर्गीय लोकही त्यापासून चार हात लांबच राहू लागले आहेत. मात्र यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच सुवर्णबाजारात चमत्कार घडला.
धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात 3 हजार तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार ऊपये घसरण झाली. या घसरणीमुळे सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. सोनारांसाठी तर हा योग ‘सोने पे सुहागाच’ ठरला. अखिल भारतीय व्यापारी महासंघांच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार गत वर्षाच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यानी जास्त खरेदी झालेली आहे. असे असले तरी ग्राहकांनी प्रत्यक्ष दागिन्यांपेक्षा 9 ते 18 कॅरेटच्या हलक्या दागिन्यांची आणि त्यातल्या त्यात डिजिटल गोल्ड, नाणी यांची खरेदी करण्यास प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून ग्राहकच नसल्याने मंदिच्या भीतीने चिंताग्रस्त बनलेल्या सोनारांना बराच मोठा दिलासा मिळाला.
सणावारांना लोक मोठ्या प्रमाणात सोने चांदीच्या वस्तुंची खरेदी करतात याची जाणीव असल्याने बहुतेकदा याच काळात त्यांच्या किंमतीमध्ये किरकोळ किंवा काही प्रमाणात वाढ ही हमखास होत असते. तरीही हात आखुडता न घेता लोक सोन्याची खरेदी करत असतात. पूर्वी गोव्यात केवळ स्थानिक सोनारांचीच लहानमोठी दुकाने किंवा घरगुती व्यवसाय चालायचा. हल्लीच्या काही वर्षांमध्ये देशभरातील मोठमोठ्या पेढ्या स्थापन झाल्या असून त्यांची संख्या काही शेकडोंच्या घरात पोहोचली आहे. एखाद्या बाजारात चहाची टपरी किंवा पानपट्टीचा गाडा टाकावा तेवढ्या सहजतेने मोठमोठे उद्योजक आणि कंपन्या या सोनारांच्या पेढ्या स्थापन करू लागले आहेत.
यावरून सोन्याचे महत्व आणि महती लक्षात येते. हल्लीच्या वर्षांमध्ये सोने हे केवळ श्रृंगाराचे साधन राहिलेले नाही. अनेक सधन लोक त्याकडे भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहू लागले आहेत. हाती कितीही कागदी नोटा असल्या तरी त्या कधी बदलल्या जातील किंवा चलनातून बाद ठरविल्या जातील याची शाश्वती नसल्याने पर्यायी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. अशावेळी गत काही वर्षांच्या तुलनेत यंदा वर्षभरात कित्येकवेळा झालेली वाढ अनाकलनीय आणि तेवढीच आवाक्याबाहेरचीच होती. त्यामुळे यंदा खरेदी करता येईल की नाही किंवा धंदा होईल की नाही या विवंचनेत ग्राहकांबरोबरच सोनारही पिचले जात होते.