वंश-श्रवणी, अनया-अॅन्जेला यांना सुवर्ण
वृत्तसंस्था/ पुणे
येथील पीई सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए क्रीडा संकुलात झालेल्या दिवंगत सुशांत चिपलकट्टी स्मृती योनेक्स सनराईज इंडिया कनिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय ग्रा प्री बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बिगर मानांकित जोड्या वंश-श्रवणी तसेच अनया-अॅन्जेला यांनी दुहेरीमध्ये सुवर्णपदके मिळविली. या स्पर्धेत जपानच्या केझुमा केवानोने पुरूषांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकूट साधला. सदर स्पर्धा पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे भरविली गेली. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात बिगर मानांकीत जोडी वंश देव आणि श्रवणी वालेकर यांनी आपल्याच देशाच्या द्वितीय मानांकीत सी. लालरेमसेंगा आणि तारिणी सुरी यांचा 21-12, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 28 मिनिटांत पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील दुहेरीच्या सामन्यात भारताची बिगर मानांकीत जोडी अनया बिस्त आणि अॅन्जेल पुणेरा यांनी जपानच्या पाचव्या मानांकीत बॅनो आणि युनो या जोडीचा 21-23, 21-12, 21-17 अशा तीन गेम्स्मधील लढतीत पराभव करत सुवर्णपदक मिळविले. हा अंतिम सामना 70 मिनिटे चालला होता. या स्पर्धेसाठी एकूण 13,50000 रुपये (15 हजार डॉलर्स) बक्षीसाची रक्कम ठेवण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना सोनाली देशपांडे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
जपानच्या केझुमा केवानो याने पुरूषांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात आपल्याच देशाच्या तेकानोचा 23-21, 18-21, 25-23 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. हा अंतिम सामना 70 मिनिटे चालला होता. जपानच्या युझूनो वटांबेने महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील एकेरीचे विजेतेपद पटकविताना दहाव्या मानांकीत युरीका नेगाफुचीचा 16-21, 21-13, 21-17 असा पराभव केला. पुरुषांच्या 19 वर्षाखालील वयोगटातील दुहेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या केझुमा केवानोने सेवादा समवेत जपानच्या नेमोटो आणि योशीतसुगूचा 21-15, 21-18 असा फडशा पाडत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.