रुद्रांक्ष, अर्जुन, किरण, मानसी यांना सुवर्ण
वृत्तसंस्था/शीमकेंट, कझाकस्तान
येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या कनिष्ठ स्कीट प्रकारात भारताच्या मानसी रघुवंशीने सुवर्ण तर यशस्वी राठोडने रौप्यपदक पटकावले. याशिवाय वरिष्ठ गटात अर्जुन बबुता, रुद्रांक्ष पाटील, किरण जाधव यांनी 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजीचे सुवर्ण मिळविले. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीतही भारताच्या अर्जुन बबुता, रुद्रांक्ष पाटील, किरण जाधव यांनी सांघिक सुवर्ण मिळविले. या तिघांनी मिळून एकूण 1892.5 गुण मिळविले. त्यांनी चीनच्या लि झियाहाओ, लु डिंगके, वांग हाँगहाओ (1889.2) यांना मागे टाकले. दक्षिण कोरियाच्या पार्क हा-जुन, ली जुन-हवान, सेओ जुन-वॉन (1885.7) यांना कांस्यपदक मिळाले.
स्कीट नेमबाजीच्या अंतिम फेरीत मानसीने 53 गुण मिळवित पहिले स्थान मिळविले तर यशस्वीने 52 गुण घेत दुसरे स्थान घेत भारताला पहिली दोन पदके मिळवून दिली. कझाकच्या लिडिया बाशारोव्हाने 40 गुणांसह तिसरे स्थान घेत कांस्यपदक मिळविले. भारताची आणखी एक नेमबाज अग्रिमा कंवरने 15 गुण घेत सहावे व शेवटचे स्थान मिळविले. पाच फेऱ्यांच्या पात्रता फेरीत मानसीने 106 गुण घेत दुसरे स्थान मिळविले होते तर बाशारोव्हाने 112 गुण घेत पहिले स्थान मिळविले होते. यशस्वीने 102 गुणांसह पाचवे आणि अग्रिमानेही 101 गुणांसह सहावे स्थान घेत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. दरम्यान, कनिष्ठ पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या इशान सिंग लिब्राने 116, हरमेहर सिंग लालीने 115 व ज्योतिरादित्य सिंग सिसोदियाने 110 गुण घेत अनुक्रमे पहिले, तिसरे व पाचवे स्थान घेत अंतिम फेरी गाठली आहे.