सोने देणारे वृक्ष
सोन्याचा दर सध्या गगनाला भिडला आहे. या एकाच वर्षात त्याच्या दरात 70 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती दिली जाते. सोन्याला मागणी अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती असल्याने सातत्याने दर वाढत आहे. अशा काळात जर झाडे सोने देऊ लागली, तर सुवर्णप्रेमींना निश्चितच आनंद होईल, युरोप खंडातील फिनलंड या देशात संशोधकांनी अशा काही वृक्षांचा शोध लावला आहे, की ज्याच्यातून सोने मिळू शकते. हे संशोधक फिनलंडच्या ‘औलू’ विद्यापीठाचे असून त्यांनी झाडातून सोने कसे मिळते, याचे शास्त्रीय कारणही स्पष्ट केले आहे.
सोने देणाऱ्या 23 प्रकारच्या झाडांचा शोध आतापर्यंत लागला आहे. ही झाडे सुवर्णाच्या खाणीजवळच्या भागातच वाढलेली असतात. या वृक्षांचा अभ्यास करण्यासाठी ‘एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपी’ चा उपयोग करण्यात आला आहे. या 23 वृक्षांपैकी चार वृक्षांच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात सुवर्णाचा अंश आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशोधक केले जात आहे. भूगर्भातील सुवर्ण वृक्षांच्या पर्णांपर्यंत पोहचले कसे, हे रहस्य आता संशोधकांनी शोधून काढले आहे. या वृक्षांची मुळे भूमीमध्ये खोलवर रुजलेली असतात. ती भूमीतील जल शोषून घेतात. भूगर्भातील या पाण्यात सोने काही प्रमाणात विरघळलेले असते. ते या वृक्षांच्या मुळांमध्ये शोषले गेल्यानंतर तेथून त्यांच्या पानांपर्यंत येते आणि या पानांवर प्रक्रिया केल्यानंतर त्यांच्यातून सोन्याचा अंश बाहेर काढला जाऊ शकतो. येथे एक महत्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, की हे वृक्ष सुवर्ण निर्माण करत नाहीत. सवर्ण किंवा सोन्याचे उगमस्थान भूगर्भ हेच आहे. मात्र, या वृक्षांच्या मुळांच्या माध्यमातून ते त्यांच्या पानांपर्यंत पोहचते, हे शास्त्रीय सत्य आहे.
या संशोधनाचा उपयोग भूगर्भातील सुवर्ण साठे शोधण्यासाठी होणार आहे. ज्या स्थानी असे सोने देणारे वृक्ष असतील, तेथे सुवर्णांची खाण असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असे वृक्ष असणऱ्या भूमीत खोदकाम केले असता सुवर्णखाण सापडू शकते. वृक्षांच्या पानांवर प्रयोग करुन सुवर्णखाण शोधणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे आहे. त्यामुळे हे संशोधन आपल्याला सुवर्णाच्या खाणीपर्यंत पोहचवू शकते. आज जगात मौल्यवान आणि दुर्मिळ धातूंना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हे संशोधन मोलाचे ठरणार आहे, असे मानले जात आहे.