सोने-चांदी दरात लग्नसराईतच चढउतार
कोल्हापूर :
सध्या लग्नसराई सुरू असून, सोने व चांदीच्या दरात मात्र चढउतार सुरू आहे. गुरुवार (12 डिसेंबर) व शुक्रवारी (13) रोजी अवघ्या एका दिवसात सोने दहा ग्रॅममागे 900 तर चांदी किलोला 3100 रुपयांनी स्वस्त झाली. या दरवाढीच्या चढ-उतारामुळे, ऐन लग्नसराईमध्येच सराफाबरोबर ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गत (2024) केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने व चांदीवरील आयात ड्युटी 15.45 वरून 6 टक्के झाली. अर्थंसंकल्प जाहीर झाल्याबरोबर सोने 10 ग्रॅममागे 3300 तर चांदी किलोला 3100 रुपयांनी स्वस्त झाले होते. यामुळे भविष्यात सोने व चांदी आणखी स्वस्त होणार अशी अपेक्षा होती. पण 30 ऑक्टोबर 2024 ला चांदीच्या दराने लाखाची मर्यांदा पार केली. तसेच सोन्याच्या दरात ही वाढ झाली होती. चांदी 101000 तर सोने 82000 रुपये झाली होती. तर 12 डिसेंबरला सोने 80200 तर चांदी 95700 रुपये झाली होती. तर दुसऱ्या दिवशी 13 डिसेंबरला हाच दर अनुक्रमे 79300 व 92600 रुपये असा झाला. शनिवारी कोल्हापूर सराफ बाजाराला आठवडी सुट्टी असल्याने रविवारी हा दर कसा असणार याबाबत सराफ व्यावसायिक संभ्रमावस्थेत आहेत. सोने-चांदी दराच्या तफावतीमुळे अनेकवेळा सराफ व ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 9 टक्के आयात ड्युटी कमी होऊनही दराबाबत चढउतार सुरू आहे. यामुळे परदेशातून होणारी सोन्याची तस्करी अजुनही कमी झालेली दिसत नाही. ड्यूटी कमी होऊन देखील दरामध्ये चढउतार सुरू आहे.