सोने-चांदी दरात घसरण, शेअर बाजार तेजीत
कोल्हापूर :
अमेरिकेची निवडणूक, राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल यामुळे जागतिक स्तराबरोबर राज्यातील सोने-चांदी व शेअर बाजारामध्ये चढ-उतार व तेजी दिसून आली आहे. या मावळत्या वर्षी शेअर बाजारामध्ये नवीन 10 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा कल काय असणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सोने-चांदीचा दर जागतिक बुलियनकडून काढला जात असतो. जागतिक उलाढाल, युद्धाचे वातावरण, डॉलर्सचा वाढलेला दर याचबरोबर अमेरिकेची निवडणूक याचा परिणाम सराफ बाजारावर झाला होता. ऑक्टोबर 30 च्या शेवटच्या दिवशी सोने 10 ग्रॅम 82 हजार तर चांदी किलोला 1 लाख 1 हजार झाली होती. सोने 85 हजार तर चांदी सव्वा लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता सराफ बाजारमध्ये बोलली जात आहे. यामुळे दिवाळी पाडवा या काळात गुंतवणूक म्हणून लोकांची मोठी खरेदी झाली होती. दर वाढूनदेखील सराफ दुकाने व शोरूम्समध्ये खरेदीसाटी मोठी गर्दी झालेली दिसत होती.
निवडणुकीनंतर सोने व चांदी दरात घसरण सुरू झाली आहे. सध्या लग्नसराई सिझन असल्याने व सोन्याचा दर उतरत असल्याने, सराफ बाजारामध्ये सोने खरेदी सुरू आहे. शनिवारी (30 नोव्हेंबर) आठवडी सुट्टी व अमावस्या असल्याने, शुक्रवारी कोल्हापूर सराफ बाजारामध्ये सोने 79 हजार तर चांदीचा दर 92 हजार 8 शे रुपये असा होता.
राज्याचा विधानसभेच्या व उतर प्रदेशातील लोकसभा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. हे निकाल भाजपच्या बाजुने लागल्याने, भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीचे आहे. अमेरिकेच्या आरोपाखालील दबाब असणाऱ्या अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरबरोबर सरकारी बँकांच्या समभागामध्ये तेजी आली आहे. कारण अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सरकारही बदलले आहे. वर्षांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे डिसेंबरमध्ये 20 हजार कोटींच्या 10 कंपन्यांचे आयपीओ शेअरबाजारात येणार आहेत. येत्या चार दिवसात राज्याचे नविन मंत्रिमंडळ जाहीर होणार आहे. यानंतर बाजारपेठेचे चित्र स्पष्ट होणार आहे.