गोकाकमधील घरफोडी प्रकरणाचा छडा
हुबळीच्या तिघांना अटक : सोन्या-चांदीचे दागिने जप्त : काही दागिने गहाण ठेवल्याचे उघडकीस
बेळगाव : गेल्या 20 दिवसांपूर्वी गोकाक येथे झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा गोकाक पोलिसांनी छडा लावला आहे. केशवापूर, हुबळी येथील तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी हुबळी येथील सोने तारणावर कर्ज देणाऱ्या एका कंपनीत 39 ग्रॅम दागिने गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे. 31 ऑक्टोबर 2025 च्या सायंकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबरच्या रात्री 8 या वेळेत लक्ष्मी वसाहत, गोकाक येथील सचिन अशोक गोंधळी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील 330 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदी व दीड लाख रुपये रोख रक्कम पळविली होती. सोन्याच्या दागिन्यांची किंमतच 19 लाख 80 हजार रुपये इतकी होते. तर 80 हजाराची चांदी चोरट्यांनी पळविली आहे.
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, उपनिरीक्षक निखिल कांबळे, के. एन. इळगेर, जे. एच. गुडली, ए. सी. कापसी, एम. एल. हुच्चगौडर, एस. एस. कुरबेट, तांत्रिक विभागाचे सचिन पाटील व विनोद ठक्कन्नावर आदींनी चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 12 नोव्हेंबर रोजी नंदीश हणमंतप्पा सक्रेप्पन्नावर (वय 19) याला तर 13 नोव्हेंबर रोजी नवीन अशोक मुंडरगी (वय 26) व रमेश शंकऱ्याप्पा अगडी (वय 27) तिघेही राहणार केशवापूर हुबळी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्र, चार बांगड्या असे 64 ग्रॅम सोने, 590 ग्रॅम चांदी व दागिने विक्रीतून आलेले 5 लाख 6 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. या त्रिकुटाने 39 ग्रॅम सोन्याचे दागिने हुबळी येथील एका सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपनीत ठेवले असून त्याची किंमत 6 लाख 68 हजार इतकी होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते दागिने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.