For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसकेई सोसायटीच्या विज्ञान महोत्सवात गोगटे बीबीए महाविद्यालय विजेते

11:37 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसकेई सोसायटीच्या विज्ञान महोत्सवात गोगटे बीबीए महाविद्यालय विजेते
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटीच्या जीएसएस महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकताच ‘सृजन-2024’ हा विज्ञान महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महोत्सवाचे उद्घाटन एसकेई संस्थेचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. ए. हलगेकर, महोत्सवाचे समन्वयक डॉ. संदीप देशपांडे, आयक्युएसीचे समन्वयक प्रा. भरत तोपिनकट्टी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. महोत्सवाचे विजेतेपद गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीबीए महाविद्यालयाने तर उपविजेतेपद आरएलएस पदवीपूर्व कॉलेजने पटकावले.

Advertisement

विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा व तरुण पिढीचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, या दृष्टीने महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सेरेबॉक्स-प्रश्नमंजुषा, क्लायफोरम-वादविवाद, विश्वकला-चित्रकला, हार्मोनिया हस्टल-नृत्य, रिदमिक रिबेलियन- गायन, कॉस्मिक क्लिक- फोटोग्राफी, कैरोज-मास्टर अँड मिस डेडलिफ्ट- शरीरयष्टी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव परिसरातील 148 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

महोत्सवाचा सांगता समारंभ दंतवैद्य डॉ. वर्षा साठे यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. साठे म्हणाल्या, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक, मेंटर यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमधील एकसंघता, नोकरी, छंद यातून मिळणारा परमोच्च आनंद आणि आरोग्याची काळजी याविषयीचे अनमोल विचार त्यांनी मांडले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्राचार्य ए. ए. हलगेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.रमेश कटांबळे यांनी अहवाल वाचन केले. प्रा. चारुशिला बाळीकाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संदीप देशपांडे यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.