एस. के. चषकावर गोगटे कॉलेजची मोहोर
लिंगराज उपविजेता, रोहित कोडला उत्कृष्ट खेळाडू : ओमकार हन्नीगिरी उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित एस. के.चषक आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोगटे कॉलेजने लिंगराज कॉलेजचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून एस. के. चषक पटकाविला. रोहित कोडला गोगटे याला उत्कृष्ट खेळाडू तर ओमकार हन्नीगिरी उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले. सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात लिंगराज कॉलेजने अंगडी कॉलेजचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये लिंगराजने 3-1 असा विजय मिळविला.
17 व्या मिनिटाला लिंगराज संघाच्या बचाव फळीतील खेळाडूच्या चेंडू हाताला लागल्याने पंचांनी गोगटे संघाला पेनॅल्टी बहाल केली. त्याचा फायदा उठवत गोगटेच्या चैतन्य परमेकरने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला लिंगराजच्या रिहान किल्लेदारच्या पासवर मोहम्मद कैफने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी करत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर लिंगराज संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्याला अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय रेडेकर, उमेश मजुकर, वीरेश मलाबादी, अमरदीप पाटील व आनंद चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या गोगटे संघाला व उपविजेत्या लिंगराज संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू महम्मद कैफ लिंगराज, उत्कृष्ट गोलरक्षक ओमकार हन्नीगिरी, स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू रोहित कोडला गोगटे यांना चषक देण्यात आले. पंच म्हणून अखिलेश अष्टेकर, यश सुतार, शुभम यादव, ओमकार कुंडेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कौशिक पाटील, संदीप सोमनट्टी, पवन रायकर, संदीप चौगुले व स्वयंम जाधव यांनी काम पाहिले.