गोगटे महाविद्यालयकडे चॅम्पियन चषक
बेळगाव : केएलएस जीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सने जीआयटी संघाचा टायब्रेकरमध्ये 4-2 असा पराभव करून चॅम्पियन चषक पटकाविला. ओमकार हन्नीकेरी याला उत्कृष्ट खेळाडू तर आरिफला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामना गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स व जीआयटी तांत्रिक महाविद्यालामध्ये झाला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये गोगटे कॉमर्सने 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून चॅम्पियन चषक पटकाविला.
बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीआयटी महाविद्यालयाचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, क्रीडा निर्देशक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, प्रा. विख्यात कट्टी, सुभाष सिकरे, शिवानी कर्ले व निकिता पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोगटे संघाला रोख 40 हजार रु., आकर्षक चषक तर उपविजेत्या जीआयटी संघाला 20 हजार रु. रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ जैन तांत्रिक महाविद्यालय, उत्कृष्ट गोलरक्षक आरिफ, उत्कृष्ट खेळाडू ओमकार हन्नीगेरी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, राहुल पंतोजी, कौशिक पाटील, यश सुतार, शुभम यादव, ओमकार पुंडेकर, अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले.