महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लहानपण देगा देवा

06:55 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा

Advertisement

ऐरावत रत्न थोर त्यासि अंकुशाचा मार

Advertisement

तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान

एखाद्या शांत दुपारवेळी, दिवसभराच्या कामाने थकून किंचित डोळा लागत असताना, कधी नव्हे ते मिळालेल्या एखाद्या सुटीच्या दिवसाची मर्यादित झोप घेत असताना खोलीतला मुद्दाम केलेला अंधार, पंख्याचा गार बेतशीर वारा आणि कानाशी कुमार गंधर्वांचे हे सूर...सठीसहामासी कधीतरी हे गणित जुळून येतं. दुपारच्या त्या वेळेस अगदी जात्या क्षणांनाही धक्का न लावता काही गाणी संथपणे झुळुझुळू वाहत असतात. त्यांच्या वाहण्यातलं ते सुख आपल्या जिवाला जो काही विसावा देतं ना तो अगदी सुख जवापाडे म्हणत जपून ठेवावा असा. दिवसभरातल्या सगळ्या व्यथा, वंचना विसरून जाण्यासाठी यांचा उपयोग होतो. खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या पाठी लागतात त्या आपण मोठे झाल्यावर. शाळेतून भांडततंडत घरी येणाऱ्या आणि आपापले कोपरे आपापली गँग घेऊन खेळणाऱ्या लहान धोमुलांना कधी हा पेच नसतो. पण त्यांच्यावर असंख्य बंधनं आपण मोठी माणसं घालतो ती त्यांना नको असतात आणि मग ती वैतागून म्हणतात की हे लहानपण संपून आम्ही मोठे कधी होणार कोण जाणे! मला मी म्हणेन तिथे जाता आलं पाहिजे. मी म्हणेन ते खाता आलं पाहिजे. अभ्यासाची कटकट असता कामा नये, वगैरे वगैरे. प्रत्यक्षात लहान मूल मोठं झाल्यावर जेव्हा त्याला आयुष्याचे चटके बसायला सुरुवात होते तेव्हा मग त्याला वाटतं की हे मोठेपण नको रे बाप्पा... मुलांवर येताजाता डाफरणाऱ्या बापाला मनातून माहीत असतं की चिरंजिवांना आता आपली चप्पल व्हायला लागणार आहे तेव्हा सांभाळून बोललं पाहिजे. ‘प्राप्तेतु षोडषे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत’ हल्ली पावलं काळाच्या आधीच मोठी व्हायला लागल्येत. त्यामुळे जैविकदृष्ट्या ताडमाड आणि प्रगल्भतेच्या दृष्टीने लहान असं विचित्र मिश्रण स्वभावात असतं. खरं तर हे झेपत नाही. त्यातून महानगरांतून तर

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही

या संदीप खरेंच्या गाण्यासारखी परिस्थिती असते. दमलेल्या बाबाची कहाणी उगीच नाही लिहिली गेली. असंख्य लहानपणं बाबांची वाट बघत बघत एसीतल्या वातावरणात फ्रीझ होऊन कोरडी होत जातात. आणि थंड कोरडं राहिलेलं बालपण जेव्हा मोठं होतं तेव्हा भावनात्मक श्रीमंतीच नसते. पाळणाघरात बाळं वाढतात आणि त्याच बाळांचे तेव्हा तरुण असलेले आताचे म्हातारे मग म्हातारघरात म्हणजेच वृद्धाश्रमात जाऊन पोहोचतात. आपल्या लहानपणी आपण कसे नात्यांनी वेढलेले होतो, सामाजिक नातेसंबंधाच्या बाबतीत कसे दृढतर धागे आपल्या घराचे होते हे सगळं आठवत तिथल्या जराजीर्ण खुर्च्यांत अंग टाकलेली आताच्या पिढीतली तरुण मंडळी कशी असतील याची कल्पना करवत नाही. मग ‘लहानपण देगा देवा’ कसं म्हणायचं?

लहानपण अनेक प्रकारचं असतं. कुणाचं लहानपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतं तर कुणाचं लहानपण सामाजिकदृष्ट्या समृद्ध असतं. कुणाचे भरपूर नातेवाईक असतात तर कुणावर ऐन लहानपणी पितृछत्र किंवा मातृछत्र हरवण्याचा प्रसंग येतो. ते फारच करुण असतं. असं लहानपण हवहवंसं कसं वाटेल? अतिशय उच्च घराण्यात किंवा राजघराण्यातील असलेल्या मुलांबाबत सर्वांनाच हेवा वाटतो. त्यांची काय बाबा मजा आहे! तो किंवा ती तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत असं म्हटलं जातं. पण हा सोन्याचा चमचा घशाशी अडकतो कसा, हे माहीत नसतं. अगदी अंबानी, अदानी किंवा सगळ्या संस्थानांचे महाराज वगैरे मंडळींना करिअर निवडीचं स्वातंत्र्य बहुतेक नसतंच. घराण्याच्या पावलावर पाऊल टाकत वागावं लागतं. लहानपणापासून मनावर हेच बिंबवलं जातं. दायांच्या आणि नॅनीज्च्या दमदाटीतच मोठं व्हावं लागतं. सोन्याच्या पिंजऱ्यात अशी कैक बालपणं लहानपणीच प्रौढ होतात.

ऐरावत रत्न थोर त्यासि अंकुशाचा मार

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण

यातल्या ‘मोठेपण’ शब्दावर कुमारजींनी घेतलेली जागा आठवा. चढत जाणारं मोठेपण आणि उतरत जाणारी निरागसता या दोघांचं चित्र त्यात अचूक दिसतं. हे मोठेपण फार फार यातनादायी असतं. मोठं कठीण असतं. पण मोठेपणी येणाऱ्या जबाबदाऱ्या जर का लहानपणीच येत असतील तर ते लहानपण सर्वात जास्त अवघड होऊन बसतं. असं लहानपण का मागेल कोण? ज्या वयात चिंता, काळज्या वहाव्या लागत नाहीत, ज्या वयात आला दिवस उन्मुक्तपणे जगता येतो ते लहानपण. म्हातारपणाला दुसरं लहानपण म्हटलंय ते याचसाठी. कारण म्हातारपणात मुलं शक्यतो मार्गी लागलेली असतात. त्यामुळे आला दिवस मजेत घालवायचा हेच ‘लहानपण देगा देवा’ असतं. पण पुन्हा एकदा एक गोष्ट म्हणजे सर्व म्हाताऱ्या माणसांना हे लहानपण अनुभवायला मिळत नाही. त्यांची मुलं आयुष्यात स्थिर नसतात. कौटुंबिक काळज्या वहाव्या लागतात. आरोग्य चांगलं नसतं. मग शिल्लक राहतं ते वेदनादायी म्हातारं शिळेपण. यातून सुटका हवी असेल तरी ती होत नाही. अशी उदास म्हातारी लोकंही देवाकडे काय मागत असतील बरं हा प्रश्न पडतो. बहुतेक ‘लहानपण देगा देवा’ असंच म्हणत असतील.

महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती

तुका ह्मणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान

तुकाराम महाराजांना काय सांगायचं असेल बरं या ओळीतून? आतापर्यंतचं पद, पैसा, प्रतिष्ठा यांचा अहंकार सोडावा. कारण माणसाला माणसांची असणारी गरज सर्वात जास्त असते. लहान मूल आणि म्हातारं माणूस यांना ही गरज सर्वात जास्त असते. लहान मूल जसजसं बाहेरच्या जगात जाईल तसतसा त्याचा अहंकार शिस्तीत यायला सुरुवात होते. हेच ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती’ चं तत्त्व होय. लहानपणी भावनांमधले पूर लवकर येतात तसेच ते आवरायलाही शिकता येतं कारण मन लव्हाळ्यासारखं लवचिक असतं. म्हणून अनावश्यक ताठा आणि अहंकार यामुळे होणारं नुकसान किंवा उध्वस्त होणं कसं टाळावं हे ती चटकन शिकतात. मोजक्या आठ दहा ओळीतून तुकाराम महाराज एवढं सगळं सांगतात? तर होय. आणि पदाचा विस्तार करून कुमार गंधर्व त्यातल्या काही गोष्टी आणखीन स्पष्ट करून सांगतात. त्यांचं वैशिष्ट्या असं की दरवेळी आपल्याला नवीन कळतं.

कोणतीही नवीन गोष्ट शिकताना बालवृत्तीने शिकावी असं म्हणतात. आपणही म्हणूया का? की यासाठीच लहानपण देगा देवा..

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article