महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवा मी तुम्हाला कंजूष का म्हणू नये?

06:34 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भक्तीचे महात्म्य उद्धवाला चांगलेच माहिती होते म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत भक्ती करण्याची संधी सोडायला तयार नव्हता. तो भगवंतांना म्हणाला, देवा, तू मला मुक्ती दिलीस तरी तुझे भजन करू शकीन अशी तू माझ्यावर कृपा कर. म्हणजे मुक्तीचे दुषण दूर होईल आणि तीही पावन होईल. उद्धवाचे भजनावरील अतीव प्रेम पाहून भगवंत चकित झाले. उद्धव पुढे म्हणाला, जरी तुम्ही मला मुक्ती दिलीत तरी देह नसल्याने मुक्ती हे सद्गुरूभजनात येणारे विघ्न आहे असे मी समजतो. हे विघ्न टाळून सद्गुरूंची म्हणजे तुमची भक्ती निर्विघ्नपणे कशी करता येईल ते कृपा करून मला सांगा. माझे मागणे तुम्हाला कदाचित विचित्र किंवा उफराटे वाटेल. ह्यावर भगवंत मोकळेपणाने हसले आणि म्हणाले, कोटी जन्म मुक्ती मिळण्यासाठी शिणल्यावर क्वचित कोणाला तरी मुक्ती प्राप्त होते. असा लाखात एखादा निघालाच तरी तो शेवटपर्यंत जाईलच अशी खात्री नसल्याने मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यातल्या लाखात एखाद्यालाच मुक्ती मिळते इतकी ही अप्राप्य गोष्ट आहे. उद्धवा तुला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? उद्धवाने त्याला सर्व समजत आहे अशा अर्थाने मान हलवली. भगवंत पुढे म्हणाले, एव्हढे सगळे समजत असूनसुद्धा दुर्मिळातली दुर्मिळ मुक्ती तुला मी अत्यंत प्रेमाने देऊ केलीये हे लक्षात न घेता तू म्हणतोयस की, तुला मुक्ती पसंत नाही हे आश्चर्य नव्हे काय? एव्हढेच नव्हे तर मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला देऊ केलेल्या मुक्तीला तू विघ्न म्हणतोयस मग तुला मी मूर्ख का म्हणू नये? त्यावर उद्धव भगवंतांना म्हणाला तुम्ही मला मूर्ख म्हणा किंवा काहीही म्हणा पण ज्यामुळे सद्गुरुभजन थांबणार असेल, त्यात अडथळा येणार असेल तर माझ्या दृष्टीने ते सगळ्यात मोठे विघ्न होय. त्यामुळे तुमच्या भक्तिला खो देणाऱ्या मुक्तपणाची मला काहीच मात्तबरी वाटत नाही. हं आता तुम्ही अशी काही युक्ती सांगत असाल की, ज्यामुळे माझे मुक्तपण नित्य राहील आणि भक्तीच्या वाटेवरही मला चालता येईल तर मी तुमचा उतराई होईन. तेव्हा कोणताही संकोच न वाटून घेता मला ताबडतोब ही युक्ती कृपाळू देवा तुम्ही सांगा. ह्यावर तुम्ही विचाराल की, मी तुला नित्य मुक्ती दिली आहे त्यावर तू समाधानी नाहीस मग ह्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? त्यावर देवा मी असे म्हणीन की, तुम्ही जे मुक्ती दिली, मुक्ती दिली असे वारंवार म्हणताय ना त्यात तुम्ही मुद्दामहून देण्यासारखे काहीच नाही. मी तुमची निरपेक्ष भक्ती करत असल्याने तुम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे मुक्ती माझ्यापाशी आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्ही मला मुक्ती दिलीत असे तुमचे बोलणेच मिथ्या आहे. मिथ्या म्हणायचे कारण म्हणजे दिसताना तुम्ही मला मुक्ती दिलीत असे चारचौघात दिसते पण प्रत्यक्षात ही मुक्ती माझ्याकडे आधीपासूनच आहे. मग ह्यात तुम्ही मला वेगळे काय दिलेत? तुम्ही मोठे उदार दाते आहात अशी तुमच्या दातृत्वाची ख्याती आहे पण तसे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून द्यायचे असेल तर माझी नित्यमुक्तता राखून मला तुमची भक्ती करता येईल अशी काही व्यवस्था करा. तुम्ही असे केलेत तर तुम्ही उदार दाते आहात हे मी मान्य करीन. अर्थात अशी व्यवस्था तुम्ही नाईलाजाने नव्हे तर स्वखुशीने केली पाहिजे. नाईलाजाने तुम्ही अशी व्यवस्था केलीत तर मला तुमचे चित्त उल्हसित दिसणार नाही. अशा परिस्थितीत तुमची उदारता न दिसून तुम्ही माझ्याबाबतीत केलेली कंजुषी मात्र दिसेल. तुम्ही कंजूष आहात असे मी का म्हणतोय तेही मी सांगतो. तुम्ही भक्ताला मोठ्या दानशुरतेचा आव आणून जीवनमुक्ती प्रदान करता आणि त्याबदल्यात त्यांची गुरुभक्ती करायची संधी हिरावून घेता. म्हणजे हा सरळ सरळ आवळा देऊन कोहळा काढून घ्यायचा प्रकार झाला. गुरुभक्ती ही तुम्ही देत असलेल्या मुक्तीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. मग मी तुम्हाला कंजूष का म्हणू नये?

Advertisement

 

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article