महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भगवंत कुणाच्या मनात काय आहे हे समजून असतात

06:56 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, कृष्णमूर्ती जरी सगुण असली तरी त्यांच्या देहाचे दहन झाले असे समजण्यात अर्थ नाही. त्यांच्या देहाचे दहन झाले असे समजले तर त्यांच्या देहाच्या दहनाबरोबर सर्व जगाचे दहन व्हायला पाहिजे होते कारण त्यांच्या आश्रयाने संपूर्ण जग चालले आहे. श्रीकृष्णांचा देह जर दहन केला असता तर त्याबरोबर ब्रह्मांडाचे दहन केल्यासारखे झाले असते कारण हे ब्रह्मांड त्यांच्यातच सामावलेले आहे. ही श्रीकृष्णांची अगम्य गती महादेव आणि ब्रह्मदेवांच्या मतीच्या पलीकडची असल्याने त्यांनाही असेच वाटत होते की, श्रीकृष्ण आपल्याबरोबर येतील. अर्थातच ह्या कल्पनेने समस्त देवगणांनी आनंद व्यक्त केला. भगवंतांच्या स्वागतासाठी निरनिराळ्या देवांची दिव्य वाद्ये वाजू लागली. पुन्हा एकदा दिव्य फुलांचा वर्षाव श्रीकृष्णनाथांच्यावर होऊ लागला. भगवंत पुन्हा परत येणार ह्याचा देवांना विशेष आनंद झाला होता अर्थात त्याला तसे सबळ कारण होतेच. स्वर्गातले देव झाले तरी तेही सगुण रुपात असल्याने त्यांनाही विकार होतेच. त्यानुसार त्यांना भगवंतांच्या वैकुंठातील संपत्तीचा मोह जडला होता. त्यातील काही भाग आपल्याला मिळावा असे त्यांना वाटत होते. त्यादृष्टीने त्यांनी असा विचार केला होता की, भगवंतांनी येताना वैकुंठातील सर्व संपत्ती पृथ्वीवर आणलेली आहे. आता परत जाताना ती ते बरोबर घेऊन जाणार परंतु त्यांनी दिलेल्या वचनानुसार ते परत जाता जाता आमच्या प्रत्येकाच्या घरी येणार आहेत, त्यावेळी त्या संपत्तीतील काही भाग आम्हाला भेटीदाखल दिल्याशिवाय राहणार नाहीत. सर्व देव भगवंतांच्या संपत्तीतला काही वाटा आता आपल्याला मिळेल असे मांडे मनात खात होते पण तेव्हढ्यात एक आश्चर्य घडल्याने त्यांच्या मनातील मांडे मनातच राहिले. ब्रह्मदेव, महादेव इत्यादि देव सावध राहून पहात असतानाच बघता बघता सगळ्यांच्या तर्काला फाटा देऊन श्रीहरी दिसेनासे झाले. तेथे जमलेल्या देवांना असा गर्व झालेला होता की, आम्ही मायेचे नियंते आहोत त्यामुळे माया आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. उलट तीच आमच्या नजरेखाली काम करते. आम्हाला सर्व परिस्थितीची जाणीव असून सकळ भूत, भविष्य जाणणारे आम्ही सर्वज्ञ आहोत पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नव्हती. देवांना झालेला गर्व भगवंतांनी जाणलेला होता. कुणाच्या मनात काय चाललेले आहे हे भगवंतांपासून कधीच लपून रहात नाही. देव तरी त्याला कसे अपवाद असतील? म्हणून त्या सगळ्यांचे गर्वहरण करण्यासाठी श्रीहरींनी अशा पद्धतीने वैकुंठगमन केले. श्रीहरी आपल्याला धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीने वैकुंठाला गेले हे पाहिल्यावर देवांना लाजल्यासारखे झाले. त्यांच्या गर्वाचे घर अगदीच खाली झाले होते. श्रीकृष्णांची वैकुंठगमनाची गती महादेवांच्यासह कुणाच्याही समजुतीच्या पलीकडे असल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. देवगण असे आश्चर्यात पडले असतानाच सत्य-धर्म-श्री-धृति-कीर्ती ही सर्व भगवंतांच्याबरोबर कायम राहणारी मंडळी कुणाचीही पर्वा न करता श्रीकृष्णनाथांच्याबरोबर राहण्यासाठी निघाली. ज्या भक्तांनी श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेतले आहे त्याच्या हृदयी ते नित्य वास करतात आणि त्यांच्याबरोबर सत्य धर्म श्री धृति कीर्ती ह्यांची साम्राज्येही त्याच्या हृदयात आपोआपच स्थापन होतात. केवळ भक्तांवर अनुग्रह करणाऱ्या श्रीकृष्णाची लीला अगाध असल्याने त्यांची गती इतर कुणाच्याही समजुतीच्या पलीकडची होती. इंद्र बृहस्पती मुख्यत्वे ब्रह्मा इत्यादी सर्व देवांना भ्रमात पाडून श्रीकृष्णनाथांनी निजधामात प्रवेश केला. खरोखरंच त्यांचा महिमा अतर्क्य आहे. स्वत:च्या गतीचा, शक्तीचा देवांना बिलकुल अंदाज न येऊ देता त्यांनी निजधामाकडे गमन केले होते.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article