कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निरपेक्ष भक्तीची परतफेड करण्यासाठी देव धडपडतो

06:06 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दहावा

Advertisement

लभन्ते स्वर्गतिं यज्ञैरन्यैर्धर्मैश्च भूमिप । सुलभास्ताऽ सकामानां मयि भक्तिऽ सुदुर्लभा ।। 15 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार, बाप्पा म्हणतात, इच्छायुक्त कर्म करणाऱ्यांना स्वर्गादि गती सुलभ आहेत पण माझे ठिकाणी भक्ति जडणे दुर्लभ आहे. बहुतांश भक्तांना भक्तीच्या बदल्यात काही ना काही अपेक्षा असतात. संत मंडळी म्हणतात, भक्तीच्या माध्यमातून देवावर निरतिशय प्रेम करा म्हणजे तोही तुमच्यावर प्रेम करू लागेल. त्याच्या तुमच्यावरील प्रेमातून तुम्हाला इतका आनंद मिळेल की, त्यापुढे स्वर्गसुखाचा आनंदही फिका पडेल.

Advertisement

लोक म्हणतात की, मुलांना हवी असलेली गोष्ट वडिलांकडे मागायचा हक्क असतो मग देवाकडे मागितलं तर बिघडलं कुठं असं म्हणून भक्त आपल्या मागण्यांचं समर्थन करतात पण आईवडिलांना मुलाच्या गरजा माहीत असतात आणि ते त्यांची वेळोवेळी पुर्तताही करतात. त्याप्रमाणे देव आपल्या भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतो.

हा झाला एक मुद्दा, दुसरं म्हणजे देवाला सर्व कळतं असं आपण समजतो मग आपल्याला कशाची गरज आहे हे त्याच्या लक्षात येत असेलच आणि तो ती आपण न मागताच पुरवतो अशी जर खात्री असेल तर मागायची गरजच काय? तिसरं म्हणजे देव हा सर्वश्रेष्ठ दाता आहे हे लक्षात घेतलं तर आपली मागणी त्याच्या दातृत्वापुढे अगदीच किरकोळ असेल. त्यामुळे देव आपल्याला अगदी त्रिभुवनाचं राज्य द्यायला तयार असताना आपण त्याच्याकडे केरसुणी मगितल्यासारखं होईल व आपलं कल्याण करून घेण्याची संधी आपण गमावली असंही होईल. पण सर्वांनाच हे विचार पटतील असं नाही. त्यामुळे ते सकाम भक्तीचं समर्थन करतात.

म्हणून बाप्पा म्हणतायत, की माझ्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा करणारे खूप आहेत कारण अशी भक्ती सुलभ असते पण माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता माझी भक्ती करायच्या निमित्ताने माझ्यावर प्रेम करणारे दुर्लभ आहेत.

बाप्पांचे सांगणे लक्षात घेऊन असं म्हणता येईल की, देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठी देवभक्ती करण्याला सुरवात करण्यापासून, देवा तुझ्याकडून मला काहीही नको असे म्हणण्यापर्यंत मजल जाणे ह्याला देवभक्तीचा कळस म्हणता येईल. देव सर्वांकडे लक्ष पुरवत असतो हेही खरे पण त्याचे खरे प्रेम त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या भक्तांवर असते हेही तितकेच खरे ! त्यांच्या अडीअडचणीच्यावेळी देव आपणहून धावत जातात.

ह्याची कित्येक उदाहरणे आपल्या पौराणिक कथातून वाचायला मिळतात. निरपेक्ष भक्तांच्या प्रेमाचं त्यांना  ओझं होतं आणि त्याची परतफेड करण्यासाठी ते त्यांना ते करत असलेली कामे करण्यासाठी मदत करू लागतात. तुकाराम महाराजांनी पुढील अभंगात हेच सांगितले आहे.

उचनीच काही नेणे भगवंत। तिथे भाव भक्ती देखोनिया ।।1।। दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी।।2।। चर्म रंगू लागले रोहिदासा सांगे। कबीराचे मागे विणी शेले ।।3।। सजन कसाया विकू लागले मास, मळा सावत्यास खुरपु लागे ।।4।। नरहरीसोनारा नळी फुंकू लागे । चोख्यामेळ्या संग ढोरे ओढी ।।5।। नामयाच्या जनीसवे वेची शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।6।। नाम्यासवे जेवि नव्हे संकोचित ।ज्ञानियाची भिंत अंगी ओढी ।।7।। अर्जुनाची घोडी हाकी हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।8।। गौळियांचे घरी अंगे गाई वळी । द्वारपाळ बळी द्वारी जाला ।।9।। एकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबऋषीचे सोशी गर्भवास ।। 10।। मीराबाई साठी घेतो विष प्याला ।दामाजीचा जाला पाडेवार ।।11।। घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी मेहत्याची अंगे भरी ।।12।।पुंडलिकासाठी अजुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची।।13।।

क्रमश:

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article