ईश्वर आत्मरूपात आपल्या शरीरातच वास करून असतो
अध्याय चौथा
मनुष्य सतत त्याच्या देहाचे कोडकौतुक करत असतो. मी म्हणजेच देह अशी कल्पना दृढ असल्याने त्याला हवं तसं झालं की, तो सुखी होतो. त्याला नको असेल तसं घडू लागलं की, त्याला वाईट वाटतं. जेव्हा ईश्वराचा विसर पडतो तेव्हा देहबुद्धी प्रबळ होते पण ज्या साधकांना ईश्वरी अस्तित्वाची जाणीव सतत होत असते. त्यांना सर्वत्र ईश्वराशिवाय काहीच दिसत नसते. प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत ईश्वरी अंश जाणवत असतो. प्रत्येक परिस्थितीत त्याला ईश्वरी हात दिसत असतो. सर्व जग ब्रह्ममय आहे आणि ब्रह्मा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला येथे जागा नाही हे तत्वज्ञान त्यांना पुरेपूर पटलेलं असल्याने सर्वत्र ईश्वर सोडून अन्य काही नाहीच हे ब्रह्मज्ञान त्यांना झालेलं असल्याने सुख, दु:ख, मोह या देहाच्या कोणत्याही अवस्था त्यांना जाणवत नाहीत. प्रारब्धानुसार आलेले भोग ते भोगत असतात. देह प्रारब्धावर टाकायची कला त्यांना साधलेली असते. त्यामुळे भोगांच्या दु:खाकडे ते दुर्लक्ष करू शकतात. परिणामी त्यांच्या साधनेत खंड पडत नाही. मासा कायम पाण्याने वेढलेला असल्याने त्याला पाण्याशिवाय इतर काही अस्तित्वात आहे असे वाटतंच नाही. त्याप्रमाणे सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची खात्री असल्याने ब्रह्मज्ञानी साधकाला इतर गोष्टींचे अस्तित्व तसेच देहाशी संबंधित असलेल्या रागलोभादी भावना जाणवत नसतात. तो सदासर्वकाळ ब्रह्मानंदात मश्गुल असतो पण सामान्य मनुष्याचे तसे नसल्याने त्याला देवलोक, गंधर्वलोक इत्यादीबद्दल मोठं कुतूहल असतं. म्हणून वरेण्य महाराज बाप्पांना पुढील प्रश्न विचारत आहेत.
किं सुखं त्रिषु लोकेषु देवगन्धर्वयोनिषु ।
भगवन्कृपया तन्मे वद विद्याविशारद ।। 20 ।।
अर्थ- हे विद्याविशारदा भगवंता, त्रैलोक्यामध्ये आणि देवगंधर्वादि योनींमध्ये खरे सुख कोणते ते मला कृपा करून सांगा.
विवरण- स्वर्गात देव राहतात तेव्हा तिथे सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभी असतील तसेच गंधर्वानाही देहाला प्रिय असलेली सर्व सुखं सहजी मिळत असतील असं देहसुख म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या सामान्य मनुष्याला वाटत असतं. ते आपल्याला इथंही मिळावं आणि मृत्यूपश्चात स्वर्गातही मिळावं असं त्याला मनापासून वाटत असतं. त्यादृष्टीने त्यांची सकाम आराधना आणि दैनंदिन कर्मे चालू असतात. देव आणि गंधर्व यांना कोणते सुख मिळते हे जाणून घेण्याची त्याला उत्सुकता असते. ते समजावे म्हणून वरेण्य महाराजांनी बाप्पांना विनंती केली आहे.
त्यांच्या प्रश्नाला पुढील श्लोकातून बाप्पांनी मोठ्या खुबीने उत्तर दिले आहे. ते म्हणतात,
आनन्दमश्नुतेऽ सक्तऽ स्वात्मारामो निजात्मनि ।
अविनाशि सुखं तद्धि न सुखं विषयादिषु ।। 21।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, आसक्तिरहित असलेला मनुष्य स्वत:च्या आत्म्याचे ठिकाणी आराम पावतो, स्वत:चे आत्म्याचे ठिकाणी आनंद भोगतो. हे शाश्वत सुख होय, विषयादिकांचे ठिकाणी मिळणारे सुख शाश्वत नव्हे.
विवरण- सामान्य माणूस वस्तू, व्यक्ती व परिस्थिती त्याच्या मनासारखी असली की, सुखी असतो आणि ह्याप्रमाणे त्याच्या इच्छेनुसार सदासर्वकाळ मिळावं म्हणजे आपण कायम सुखी राहू असं त्याला वाटत असतं पण त्याचा अनुभव असा असतो की, सदासर्वकाळ परिस्थिती त्याला अनुकूल असतेच असं नाही. मग तो असं म्हणतो की, कदाचित स्वर्ग किंवा गंधर्वलोकातील परिस्थिती देव गंधर्वांना कायम अनुकूल असत असेल, म्हणून तिथं कसं आणि कोणतं सुख मिळतं असं सामान्य माणसाच्यावतीने वरेण्य राजानं बाप्पांना विचारलंय. बाप्पांनी दिलेल्या उत्तराचा आशय जाणून घेणं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल पुढील भागात सविस्तर विचार करू.
क्रमश: