For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये भाजपकडून ‘ईश्वर मॉडेल’

06:47 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये भाजपकडून ‘ईश्वर मॉडेल’
Advertisement

संदेशखालीच्या रेखा पात्रा यांना उमेदवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ बशीरहाट

भाजपने पश्चिम बंगालमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. यात कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशांचाही समावेश आहे. भाजपच्या पाचव्या यादीत सर्वात चकित करणारे नाव रेखा पात्रा यांचे राहिले असून त्यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघ्धात उमेदवारी देण्यात आली आहे. रेखा पात्रा या संदेशखाली आंदोलनाच्या चेहरा राहिल्या आहेत. रेखा पात्रा यांना उमेदवारी देत भाजपने एका दगडातून अनेक पक्षी मारले आहेत.

Advertisement

संदेशखालीच्या घटनेला निवडणूक प्रचाराच्या गोंगाटात पुन्हा राष्ट्रीय स्तरावर आणले आहे. तसेच निवडणूक प्रचारात संदेशखाली घटना बंगालमध्ये मुख्य मुद्दा ठरणार असल्याचा संदेशही दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आतापर्यंत 38 उमेदवार जाहीर केले असून 4 उमेदवार लवकरच जाहीर केले जाऊ शकतात. पक्षाकडून डायमंड हार्बर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. याचबरोबर आसनसोलमध्ये पवन सिंहने उमेदवारी नाकारल्यावर दुसऱ्या दावेदाराचा शोध सुरू आहे. तेथे तृणमूल खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे आव्हान असणार आहे. याचबरोबर बीरभूम तसेच झाडग्राम मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

पाचव्या यादीत सामील रेखा पात्रा यांच्या नावाची सध्या चर्चा होऊ लागली आहे. रेखा पात्रा यांना यापूर्वी भाजपच्या नेत्यांसोबत पाहिले गेले नव्हते. तसेच त्यांची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. मग भाजपने त्यांना उमेदवारी का दिली असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालात लपलेले आहे.

ईश्वर साहू यांचे उदाहरण

2023 च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने अशाच तुलनेत सामान्य नागरिक असलेल्या ईश्वर साहू याना साजा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. ईश्वर साहू पेशाने मजूर होते. त्यांचा पुत्र भुवनेश्वर साहूची एप्रिल 2023 मध्ये झालेल्या सांप्रदायिक हिंसेत हत्या झाली होती. या घटनेनंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने साहू यांना 10 लाख रुपयांची भरपाई आणि शासकीय नोकरीचा प्रस्ताव दिला होता, जो साहू यांना धुडकावुन लावला होता. यानंतर ईश्वर साहू बेमेतरा आणि कवर्धा हिंसेच्या पीडितांचा चेहरा ठरले होते. भाजपने विधानसभा निवडणुकीत सांप्रदायिक हिंसेचा मुद्दा लावून धरत बेमेतरातील साजा मतदारसंघात ईश्वर साहू यांना उमेदवारी दिली. साहू यांना उमेदवारी दिल्याने छत्तीसगडमधील साहू समुदायाने भाजपला एकगठ्ठा मतदान केले. यामुळे प्रारंभी पिछाडीवर असलेल्या भाजपने काँग्रेसला सत्तेवरून दूर करण्यास यश मिळविले होते. भाजपने 90 सदस्यीय विधानसभेत 54 जागा जिंकल्या. तर ईश्वर साहू यांनी सलग 7 वेळा विजयी झालेले काँग्रेस नेते रविंद्र चौबे यांना पराभूत करण्याची किमया साधली होती.

मिशन 30 अन् रेखा पात्रांना उमेदवारी

रेखा पात्रा या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ईश्वर साहू मॉडेल आहेत. त्या संदेशखालीमध्ये शाहजहां शेखच्या अत्याचार पीडितांपैकी एक आहेत. रेखा यांचा चेहरा भाजपच्या व्हिक्टिम कार्डपेक्षा अधिक ममता सरकारच्या अपयशाचे प्रतीक ठरू शकतो. संदेशखाली हिंसेचा मुद्दा राज्यात सध्या प्रचंड गाजत आहे. उत्तर 24 परगणातील 5 लोकसभा मतदारसंघ बशीरहाट, बॅरकपूर, दमदम, बांगांव आणि बारासातमध्ये याचा प्रभाव दिसून येणार आहे. यातील बॅरकपूर आणि दमदमवर भाजपने यापूर्वीच विजय मिळविला होता. याचबरोबर उत्तर 24 परगण्याला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्येही रेखा पात्रांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे. संदेशखालीमधील शेख शाहजहांच्या दहशतीची कहाणी जमीनवादाशी जोडली गेलेली आहे. भाजपने राज्यातील 42 पैकी 30 जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. बंगालमध्ये छत्तीसगडचे ईश्वर मॉडेल कितपत यशस्वी ठरणार हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.