महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वांशी समभावाने वागणारा ईश्वराचं सगुण रूप असतो

06:07 AM Oct 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, सत्संगतीमुळे मनुष्याला सदगुण प्राप्त होतात. त्यानुसार वर्तन केल्यामुळे व्यवहारातील आपत्तींचा नाश होऊन येथील जीवन हिताचे होते व परलोकातही सुख मिळते. माणसाला सत्संग सोडून इतर गोष्टी आवडत असतात कारण पैशाच्या, अधिकाराच्या जोरावर व कुसंगतीमुळे इतर गोष्टी सुलभ म्हणजे प्रयत्नाने मिळू शकतात पण सत्संग करावासा वाटणं ही अहोभाग्याची गोष्ट आहे. पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे गेल्या जन्मी नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. सत्संग लाभला व त्यानुसार श्रद्धेने वर्तणूक झाली की, हातून जे कार्य घडते ते जणू तो ईश्वराच्या सगुण रूपात करत असलेले कार्य ठरते. साहजिकच त्याला ते बंधनकारक होत नसल्याने त्याचे नवीन प्रारब्ध तयार होत नाही व तो जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होतो.

Advertisement

ईश्वराच्या सगुण रूपात वावरत असलेल्या मनुष्याची मन:स्थिती कशी असते ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

तत सर्वाणि भूतानि स्वात्मन्येवाभिपश्यति ।

अतिपापरतो जंतुस्ततस्तस्मात्प्रमुच्यते ।।44 ।।

अर्थ- सत्संगानंतर स्वत:चे ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत असे तो पाहतो. त्यामुळे अत्यंत पापाचे ठिकाणी रत असला तरी त्यापासून मोकळा होतो.

विवरण- बाप्पा म्हणतात, सत्संगात एव्हढी ताकद आहे की, त्यामुळे ब्रह्मज्ञान होते ते झाल्याने स्वत:चे ठिकाणी त्याला सर्व भूतमात्र दिसू लागतात. हा चमत्कार कसा घडत असेल यावर विचार केला तर लक्षात येतं की, आपण आधी बघितल्याप्रमाणे सत्संगामुळे मनुष्यातले दुर्गुण नष्ट होतात व सद्गुण जोपासले जातात. या सद्गुणातला सगळ्यात मोठा सद्गुण हा आहे की, सर्वांकडे सारख्याच भावाने पहायचं. हा आपला तो परका असा विचार करायचा नाही ह्या विचारांशी सदैव टिकून रहायचं. सर्वांकडे सारख्या भावाने पहायचं म्हणजे ज्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते कोणत्याही अपेक्षेविना करायचं. हे तसं अवघड काम आहे कारण सर्वांशी सम भावनेनं वागणाऱ्याची वागायची पद्धत बघितल्यावर समोरचे त्याचा गैरफायदा घेतायत हे लगेच लक्षात येतं आणि समभावाने वागण्याचा विचार बदलण्याची शक्यता असते. साहजिकच मनात आपपर भाव डोकं वर काढू लागतो. अशावेळी, संतांचा सहवास, संत साहित्याचा अभ्यास मनुष्याला त्यानं त्याच्या निश्चयाला धरून राहणं कसं इष्ट आहे हे मनावर बिंबवत असतो. त्याचा परिणाम होऊन समोरच्याची वर्तणूक गैर होत असली तरी तो त्याच्या निश्चयाला धरून राहतो. कधीकधी व्यावहारिकदृष्ट्या त्याचं नुकसानही ह्यात होत असतं पण ज्याला स्वत:चे पारमार्थिक भले करून घ्यायचे आहे तो व्यवहारातील नफ्यातोट्याचा विचार करत नसतो. कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांशी समभावाने वागणे असा निश्चय एकदा झाला की, त्यानुसार सदैव वतर्णूक होऊ लागते. स्वत: ईश्वर सर्व भूतमात्रे त्यांची लेकरे आहेत ह्या भावनेने वागत असतात, ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे त्याच्याशी ते वागत असतात. भगवतगीतेत ह्याची पुष्टी करताना भगवंत म्हणतात, भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी । माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ।। 4.11 ।। हे लक्षात घेतलं की, जो मनुष्य ईश्वराप्रमाणे सर्वांशी समभावाने वागतो तो आपोआपच ईश्वराचं सगुण रूप होतो हे लक्षात येतं. अशावेळी तो करत असलेलं कार्य हे ईश्वरी कार्य असतं. मग त्यात काही पापचरण असलं तरी त्याचा दोष त्याला लागत नाही कारण ते कोणत्याही अपेक्षेविना केलेलं असतं.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article