ईश्वर विविध रूपांनी सर्व चराचर व्यापून राहिला आहे
अध्याय सहावा
ईश्वराने जडमायेच्या सहाय्याने विश्वाला आकार दिला. मायेच्या अकरा प्रकारांनी विश्वाला विविध आकारांनी नटवले आणि मूळ मायेच्या सहाय्याने विश्वात प्राण फुंकले. त्यामुळे चराचर सृष्टी अस्तित्वात आली. त्यातील प्रत्येक पदार्थात काही ना काही गुणवैशिष्ट्यो निर्माण करून ईश्वर त्यातील स्वत:चं अस्तित्व दर्शवत असतो.
ज्याप्रमाणे एखादा लेखक लेखाच्या शेवटी त्याचं नाव घालतो, चित्रकार त्याचं नाव चित्रावर रंगवतो, काही वैशिष्ट्यापूर्ण दस्त तयार केला की, त्यावर सही घेतली जाते या सगळ्यामागचं उद्दिष्ट असं असतं की, त्या सर्व कृतीतून अदृश्यपणे तो मनुष्य डोकावत असतो. त्यानुसार प्रत्येक पदार्थातल्या वैशिष्ट्यातून ईश्वर डोकावत असतो. स्वत:चं अस्तित्व जाणवून देत असतो. ईश्वराने जडमायेच्या सहाय्याने विश्वाला आकार दिला. मायेच्या अकरा प्रकारांनी विश्वाला विविध आकारांनी नटवले आणि मूळ मायेच्या सहाय्याने त्या विश्वात प्राण फुंकले. त्यामुळे चराचर सृष्टी अस्तित्वात आली. त्यातील प्रत्येक पदार्थात काही ना काही गुणवैशिष्ट्यो निर्माण करून ईश्वर त्यातील स्वत:चं अस्तित्व दर्शवत असतो.
पृथ्वीमध्ये सुगंधरूपाने, अग्नीमध्ये तेजरूपाने, सूर्यामध्ये प्रभारूपाने, उदक व चंद्र यांचेमध्ये रसरूपाने, बुद्धिवानांमधील बुद्धि, तपस्व्यांमधील तप, बलवानांमधील बल अशा तऱ्हेने ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही विकारांचे ठिकाणी ईश्वराचे सगुण रूप असलेले बाप्पा स्थित आहेत. या अर्थाचे क्षितौ सुगन्धरूपेण तेजोरूपेण चाग्निषु । प्रभारूपेण पूष्ण्यब्जे रसरूपेण चाप्सु च ।।9 ।। धीतपोबलिनां चाहं धीस्तपोबलमेव च। त्रिविधेषु विकारेषु मदुत्पन्नेष्वहं स्थितऽ ।। 10 ।।
हे दोन श्लोक आपण अभ्यासत आहोत. प्रत्येक गोष्टीत असलेलं वैशिष्ट्या त्या वस्तूतील बाप्पांच्या उपस्थितीमुळे असतं. त्यांच्या अस्तित्वामुळे प्रत्येक गोष्टीला एक झळाळी प्राप्त होते. त्या वस्तूकडे बघितलं की, माणसाच्या तोंडून लगेच कौतुकाचे उद्गार निघतात. पृथ्वीचा पवित्र गंध, अग्नितील तेज, सर्व प्राणीमात्रात जीवनशक्ती, तपस्वी लोकांचे तपसामर्थ्य, तसंच प्राणिमात्रांमध्ये जे गुण असतात तेही त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशामुळेच असतात. मग कुणी दिसायला सुंदर असेल, कुणाला गाता गळा लाभला असेल, कुणाला काही कला अवगत असेल, कुणाला काही खेळ उत्तम खेळता येत असतील इत्यादी या सगळ्यातून ईश्वरी अस्तित्व ठळकपणे जाणवतं. तसं प्रत्येकजण ईश्वराचं रूप आहेच म्हणून असं म्हणतात की, ईश्वर विविध रूपांनी सर्व चराचर व्यापून राहिला आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे तिन्ही विकार ईश्वरी अस्तित्व दर्शवतात. अशाप्रकारे प्रत्येकात जी काही वैशिष्ट्यो असतील त्या त्या सर्व ईश्वरी अस्तित्वाच्या खुणा असतात पण मायेच्या प्रभावामुळे माणसांच्यात आणि ईश्वरामध्ये एक पडदा आलेला असतो जे ईश्वराची भक्ती करून मायेच्या पडद्याला बाजूला करू शकतात. त्यांनाच प्रत्येक वस्तूतील ईश्वरी अस्तित्व ठळकपणे जाणवतं पण बहुतेक लोक ते स्वत:ला कर्ता समजत असल्याने हे सर्व स्वत:चंच कर्तृत्व समजतात आणि ईश्वरी अस्तित्व नाकारतात.
क्रमश: