For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवा, सायुज्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी गुरुभक्ती मला द्या

06:33 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
देवा  सायुज्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी गुरुभक्ती मला द्या
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

उद्धव भगवंतांना म्हणाला, तुमच्या कृपेमुळे मी कृतकृत्य झालो. आता मला ना संसाराचे दु:ख वाटतं, ना भविष्याची भीती. माझे मी तू पण संपले आणि तुमच्याशी अद्वैत साधले गेले. मी आता तुमच्या उपदेशामुळे स्वानंदात निमग्न आहे. अर्थात मी आता स्वानंदात निमग्न आहे असे बोलणेही व्यर्थ आहे कारण ह्यात मी आणि स्वानंद हे वेगवेगळे आहेत असे वाटते. प्रत्यक्षात माझे असे वेगळे अस्तित्वच आता राहिले नसून केवळ स्वानंद शिल्लक राहिला आहे. आता माझ्यासाठी कोणतेही कार्य, कारण, कर्तव्यता अशी उरली नाही. थोडक्यात स्वत:हून काही करावे असे काही आता उरलेच नाही. उद्धवाचे बोलणे ऐकून, आपण केलेल्या उपदेशाचे चीज झाले. उद्धव आता संपूर्ण समाधानी झाला आहे असे भगवंतांना वाटू लागले. एव्हढ्यात उद्धवाने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, देवा श्रीकृष्णनाथा आता मी तुमच्याकडे एक मागणे मागणार आहे ते कृपा करून मला द्यावे. उद्धवाला आणखीही काही हवे आहे हे पाहून देवांना आश्चर्य वाटले. उद्धव पुढे म्हणाला, हे माझे शेवटचे मागणे आहे. आता उद्धव काय मागतो ह्याचे मोठे कुतूहल भगवंतांना वाटत होते कारण भक्ताला मुख्य जे हवे असते ते म्हणजे त्याच्या जीवाचा उद्धार होणे आणि भगवंतांनी तर उद्धवाचा उद्धार आधीच केला होता. त्यामुळे ते मोठ्या उत्सुकतेने उद्धव काय मागतो ते ऐकू लागले. उद्धवाचे मागणे ऐकून तर ते चकितच झाले. उद्धवाने मागणेच असे काही अनपेक्षित मागितले की, त्यामुळे भगवंतही कोड्यात पडले. उद्धव भगवंताना म्हणत होता की,  देवा मला असा भ्रम वाटत होता किंवा माझा असा गैरसमज झालेला होता की, जीवनमुक्ती झाली की सर्व मिळाले. जीवनमुक्तीपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही असेच मला आत्तापर्यंत वाटत होते पण आता असे लक्षात आले आहे की, जीवनमुक्ती मिळाल्यावर देह नसल्याने तुझी भक्ती करता येणार नाही. अशी कोरडी मुक्ती मला नको देवा. सद्गुरुंनी वचन दिल्याप्रमाणे शिष्याला मुक्ती जरी दिली तरी नंतर त्याला सद्गुरूंची भक्ती करायला देह मिळत नाही. तेव्हा देवा असली मुक्ती मला मिळाली नाही तरी चालेल. ह्यासाठी देवा तुम्हाला शरण येऊन मी मागणे मागत आहे की, सर्वश्रेष्ठ अशा सायुज्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी गुरुभक्ती मला हवी आहे. माझ्या मागणीवर कदाचित तू असं म्हणशील की, आत्तापर्यंत अनेकांनी माझी भक्ती केली आणि त्या सर्वांना मी मुक्ती दिली पण त्यापैकी कुणीही मुक्ती मिळाल्यावर भक्ती मागितल्याचे आठवत नाही. त्यावर मला असे म्हणायचे आहे की, देवा कसे आठवेल कारण ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या सर्वांना मुक्ती देऊन तुम्ही ठकवले आहेत पण तुमची ही युक्ती माझ्यापुढे चालणार नाही. ज्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला ते सहजच आत्माराम झाले किंबहुना तो त्यांचा अधिकारच होता असे म्हंटले तरी चालेल. एव्हढे झाले तरी ते कोणताही हेतू मनात न बाळगता तुझी भक्ती करतात. हे लक्षात घेतल्यावर तुमच्या भक्तीचा म्हणजे सद्गुरुंच्या भक्तीचा त्याग करून मुक्ती जवळ करण्याची इच्छा बाळगणे हीच एक भ्रांती आहे ह्याची खात्री पटते. भ्रांतीत पडलेला माणूस नेहमीच गोंधळलेला असतो आणि त्यामुळे तो हमखास चुकीच्या मार्गाची निवड करतो पण मी तसे करणाऱ्यांपैकी नव्हे. त्यामुळे मला मुक्ती न देता मला गुरुभक्ती करायची संधी द्या. ह्यावर तुम्ही असे म्हणाल की, ज्याला निजमुक्तता प्राप्त झाली त्याला भक्तीची काय गरज? पण मी हे तुमचे बोलणे ऐकून घेणार नाही. तेव्हा तुम्ही कितीही गोड बोललात तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तसेच तुम्हाला असे करता येणार नाही असेही मला सांगू नका कारण तुमचे सामर्थ्य मी जाणतो. तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. जे मुळातच अस्तित्वात नाही त्याला अस्तित्व देऊ शकता. तुमच्या सामर्थ्याला कोणतीही मर्यादा म्हणून नाही.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.