अवतारकाळात हाती घेतलेले कार्य भगवंत पूर्ण करतात
अध्याय दुसरा
बाप्पा राजाला सर्वांनी नेमून दिलेले कर्म का केले पाहिजे ते समजवून सांगत आहेत. ते म्हणाले, अगदी माझीसुद्धा त्यातून सुटका होत नाही. मी निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण रूप आहे. मीच सर्व सृष्टीचा निर्माता असल्याने ह्या सृष्टीतून मला नव्याने मिळवण्यासारखे काहीच नाही पण दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि भक्तांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी मी सगुण अवतार घेत असतो. त्यानुरूप मलाही कर्मे करावी लागतात. ती पाहून इतरांना प्रेरणा मिळावी असा त्यामागे उद्देश आहे. सिद्ध मंडळींनी स्वत: सिद्ध झाल्यावर आपले काम झाले, मी आता काहीही काम न करता स्वस्थ बसलो तरी चालेल असा स्वत:पुरता विचार न करता इतरांचे भले होण्याच्या दृष्टीने लोकसंग्रह करून त्यांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून द्यावी आणि स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. समाज त्यांना आदर्श मानतो. त्यामुळे त्यांचं अनुकरण करायला लोकांना फार आवडतं. आपण त्यांच्याप्रमाणे वागलो की त्यांच्यासारखं आपलंही भलं होईल असा उद्देश त्यामागे असतो. मीही जर अवतार काळात लोकसंग्रहाचे कार्य केले नाही तर लोक माझ्याप्रमाणेच वागू लागतील आणि आळसात आयुष्य घालवतील कारण त्यांना हेच बरोबर आहे असे वाटेल. त्यामुळे ते आळशी होऊन समाजाचे नुकसान होईल. पुढील श्लोकात आळस व निष्काळजीपणा वाढल्याने समाजात गोंधळ कसा निर्माण होईल ते बाप्पा समजावून सांगत आहेत.
भविष्यन्ति ततो लोका उच्छिन्ना संप्रदायिन ।
हंता स्यामस्य लोकस्य विधाता संकरस्य च ।। 2 ।।
अर्थ- मी काम न केल्यास संप्रदायाचा नाश होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि त्याला मी कारणीभूत असेन.
विवरण- बाप्पा म्हणाले, अवतारकाळात ज्या करणासाठी मी अवतार घेतलेला असतो ते कार्य पूर्ण करतो. तसं जर मी केलं नाही तर ते चुकीचं ठरेल कारण नियोजित कर्म करणे हे प्रत्येकाच्या जीवनाचे उद्दिष्ट असायला हवे. तोच नियम मलाही लागू होतो. मी जर त्याप्रमाणे वागलो नाही तर लोक माझेच अनुकरण करतील. त्यामुळे लोक आळशी होतील. समाजात गोंधळ माजून अव्यवस्था निर्माण होईल आणि त्याचा परिणाम म्हणून गणेश संप्रदायच नष्ट होईल या सगळ्याला मी कारणीभूत होईन. असं होऊ नये आणि माझा संप्रदाय नष्ट होऊ नये म्हणून मी कोणतीही चूक न करता माझे कार्य उत्तमप्रकारे पार पाडतो.
इथं एक गंमत लक्षात येते ती अशी की, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात युद्ध केलं तर संकट म्हणजे गोंधळ माजेल असं कारण युद्ध टाळण्यासाठी अर्जुनानं पुढं केलं होतं. त्यावर भगवंतांनी तू चुकीचा विचार करतो आहेस असं सांगून, युद्ध करणंच कसं योग्य आहे ते त्याला समजावून दिलं होतं. इथं बाप्पाही भगवंतांप्रमाणेच कर्म करण्याचं महत्त्व विशद करतायत. जीवनामध्ये अनेक वेळा कामं न करण्याची अनेक कारणं आपण देत असतो पण प्रत्यक्षात ते काम टाळण्याचे बहाणे असतात. बाप्पांचं हे सांगणं आपण लक्षात ठेऊ म्हणजे इथून पुढं आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायला काकू करणार नाही.
पुढील श्लोकात बाप्पा ज्ञानी आणि अज्ञानी लोक कशा पद्धतीने कर्म करतात, दोघांच्या कर्म करण्यात काय फरक आहे हे समजावून सांगत आहेत. ज्ञानी माणसाला हे माहित असतं की तो कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे आणि समोर दिसणाऱ्या वस्तू कायम टिकणाऱ्या नसल्याने त्यामध्ये गुंतून पडण्यात काही अर्थ नाही.
कामिनो हि सदा कामैरज्ञानात्कर्मकारिण ।
लोकानां संग्रहायैतद्विद्वान् कुर्यादसक्तधी ।। 25 ।।
अर्थ- कामी जन सर्वदा इच्छेमुळे व अज्ञानाने कर्म करतात. ज्ञात्याने अनासक्तबुद्धि होऊन लोकसंग्रहाकरिता कर्म करावे.
क्रमश: