ईश्वर भक्ताला त्याच्या आवडत्या रुपात दर्शन देत असतो
अध्याय नववा
ईश्वराने निरनिराळ्या देवतांची निर्मिती सृष्टीचे संचालन व्यवस्थित चालावे म्हणून केली आहे. वास्तविक पाहता ह्या निरनिराळ्या देवीदेवता ही एकाच ईश्वराची निरनिराळी रूपे आहेत पण लोक ईश्वराला बाजूला सारून त्या निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. ईश्वरही उपासनेचे फल त्यांना देत असतो. ह्या अर्थाचा येन येन हि रूपेण जनो मां पर्युपासते । तथा तथा दर्शयामि तस्मै रूपं सुभक्तितऽ।। 40 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार बाप्पा म्हणतात, ज्या ज्या रूपाने लोक माझी उपासना करतात त्या त्या रुपात मी त्यांना दर्शन देतो. माणसाने जरी निरनिराळ्या दैवतांची उपासना केली तरी ती ईश्वराचीच उपासना होत असल्याने ईश्वरही त्यांच्या भक्तीला भुलून त्यांना त्या त्या रूपात दर्शन देत असतो. त्यांचं त्याच्यावर असलेलं प्रेम त्याला फार आवडतं. संतांनी मात्र उपनिषदात ऋषीमुनींनी सांगितलेलं ईश्वराचं निर्गुण, निराकार स्वरूप बरोबर ओळखलेलं आहे पण सर्वानाच ते पटेल असं नसल्याने त्यांनी ईश्वराला सगुण रूपात आणलेलं आहे. ईश्वरानेही वेळोवेळी निरनिराळी रूपे घेऊन भक्तांचं रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना केलेली आहे. ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख करून गदिमा भगवंतांना त्यांचा अभंगात निजरूप दाखवण्याची प्रार्थना करतात. तो अभंग असा, निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो । अवरुद्ध साद माझा, प्रतिसाद त्यास द्या हो ।आला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्च या हो ।जळत्या निळ्या वीजेची प्रभू एक झेप घ्या हो । नरसिंह होवुनीया घुमवीत गर्जनासी ।शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी ।भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो । पार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा ।मुरली मनोहरा या वाजवीत पावा ।एका करांगुलीने गोवर्धना धरा हो ।राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार ।श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार ।
जाळी तनामनासी ती आग शांतवा हो ।
पूर्वी भगवंतांनी घेतलेले अवतार, तसेच ईश्वराची भक्तांना आवडणारी निरनिराळी रुपं, तसेच त्यांनी निर्मिलेल्या निरनिराळ्या देवता हा सदैव भक्तांच्या श्रद्धेचा विषय असून भक्त ज्या रूपात ईश्वराला पूजतात त्या त्या रूपात त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ईश्वर त्यांना त्यांच्या आवडत्या रूपात दर्शन देतात. अध्यायाचा समारोप करताना बाप्पा म्हणतात,
इति क्षेत्रं तथा ज्ञाता ज्ञानं ज्ञेयं मयेरितम् ।
अखिलं भूपते सम्यगुपपन्नाय पृच्छते ।। 41 ।।
अर्थ- हे भूपते, याप्रकारे क्षेत्र, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मी सांगितले.
विवरण- क्षेत्र म्हणजे शरीर, त्याला जाणणारा तो क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रक्षत्रज्ञविचार समजून घेणे हेच खरे ज्ञान होय. प्रत्येक शरीरात मी, आत्म्याच्या रूपाने वास करत असतो. ईश्वरी अंश आत्म्याच्या रूपात प्रत्येक वस्तूत आहे. सजीवांना तो हालचाल करण्याची शक्ती देत असतो. झाडे, वेली इत्यादीत असलेला ईश्वरी अंश एका जागी स्थिर राहून कार्य करत असतो. तर दगड, माती, लाकूड इत्यादि पदार्थात तो सुप्तावस्थेत असतो. ईश्वराने मायेचा उपयोग करून सृष्टीनिर्मिती केली आहे. पंचमहाभूते ही ईश्वराचीच निर्मिती असून तीही मायिक आहेत. मायेतून तयार केलेली प्रत्येक वस्तू त्रिगुणयुक्त असते. मनुष्य सोडून इतर प्राणिमात्रांच्या शरीरात त्रिगुणांच्यापैकी तमोगुण सगळ्यात प्रभावी असतो. त्यामुळे प्राणिजगतामध्ये हम करेसो कायदा, बळी तो कान पिळी या न्यायाने कारभार सुरू असतो. प्रत्येक शरीरातील आत्मा जेव्हा गुणांनी लिप्त होतो तेव्हा त्याला जीवपण प्राप्त होतं आणि त्या जीवाला त्रिगुणांच्या तालावर माया नाचवत असते. ज्याचा जो गुण प्रभावी ठरेल त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो.
क्रमश: