महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशी घुसखोरांकडे गोव्याचे पासपोर्ट

01:02 PM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुण्यात पाचजणांना अटक : तिघांकडे गोव्याचे पासपोर्ट

Advertisement

पुणे : कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई निगडी - काळभोरनगर येथील अंकुश चौकात करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी तीन जणांनी पणजी येथून पासपोर्टही काढल्याचे उघड आले आहे. या पासपोर्टद्वारे ते लवकरच परदेशात जाण्याच्या तयारीत होते. रॉकी सामोर बरूआ (28 वर्षे ), जयधन अमीरोन बरूआ (28 वर्षे), अंकुर सुसेन बरूआ (26 वर्षे), रातुल शिल्फोन बरूआ (28 वर्षे), राणा नंदन बरूआ (25 वर्षे, सर्व राहणारे चित्तागोंग, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जिकू दास उर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे) हा पसार झाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

 बंगालमधून केली घुसखोरी

सर्व आरोपी बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतातील पश्चिम बंगाल - सिलीगुडी येथे घुसखोरी केली.

बनावट दाखल्यांद्वारे आधारकार्ड

सिलीगुडी येथे त्यांनी बनावट जन्मदाखला आणि इतर कागदपत्रांद्वारे आधारकार्ड बनवले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील अंकुश चौक साईनाथनगर येथील चाळीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. पुण्याजवळील निगडी येथे त्यांनी आधारकार्डवरील पत्ते बदलून पुण्यातील पत्ते टाकले. बनावट कागदपत्रांचा वापर करीत तीन आरोपींनी गोवा येथून पासपोर्टही काढून घेतले. इतर दोन आरोपींचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाचही आरोपींना जेरबंद केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

बांगलादेशी घुसखोरांचे गोवा कनेक्शन

निगडी-पुणे येथे अटक करण्यात आलेल्या पाचपैकी तिघांजवळ गोव्यातून काढलेले पासपोर्ट असल्याचे उघड झाल्यानंतर गोव्यात एकच खळबळ माजली. गोवा पोलिसांबाबत संशयाची सुई निर्माण झाली आहे. पोलिसांनी त्यांना अहवाल दिला की त्यांनी गोवा पोलिसांचा अहवाल बनावट सादर करुन पासपोर्ट मिळविले, याबाबत स्पष्टता झालेली नाही. एकंदरीत बांगलादेशी घुसखोरांचे हे नवे गोवा कनेक्शन लवकरच स्पष्ट होईल. गोवा पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईत गोव्यात अनेक ठिकाणी रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे उघड झाले आहे.

घुसखोरांकडे गोवा पासपोर्टमुळे सरकारमध्ये एकच खळबळ

पुणे येथे पोलिसांच्या हाती सापडलेले पाच बांगलादेशी, त्यापैकी तीन व्यक्तींनी गोव्यातून पासपोर्ट प्राप्त केला आहे. या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर सरकारमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. आतापर्यंत अनेकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी असंख्य लटापटी कराव्या लागतात. प्रत्यक्षात बांगलादेशी व्यक्तींना गोव्यात लागलीच पासपोर्ट कसा काय प्राप्त होतो, याबाबत अनेक शंकाकुशंका निर्माण झालेल्या आहेत. या प्रकरणाची गोवा सरकार खरोखरच गांभीर्याने चौकशी करणार की नाही हे पाहणे आता आवश्यक ठरणार आहे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जबाबदारी वाढली असून राष्ट्रीय स्तरावर आता या प्रकरणाची नोंद घेतली जाणार आहे. कारण एखाद्या व्यक्तीला पासपोर्ट करावयाचा असल्यास त्याला पोलिसांकडून त्याची तपासणी केली जाते आणि त्या व्यक्तीची खातरजमा करून पोलिसांचा अहवाल आल्याशिवाय संबंधित व्यक्तीला पासपोर्ट मिळणे अशक्य आहे. पुणे पोलिसांनी ज्या तीन व्यक्तींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांनी गोव्यातून पासपोर्ट मिळवलेला आहे, या प्रकरणात नेमकी किती माणसे व अधिकारी गोव्यातील गुंतलेली आहेत? या व्यक्तींवर कारवाई होणार की नाही हा प्रश्न आहे. या प्रकरणाने गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत हे स्पष्ट होते. पासपोर्ट सारखे प्रकार गोव्यात ते देखील बांगलादेशींना प्राप्त होते ही अत्यंत आश्चर्यकारक घटना आहे व तेवढीच चिंता वाढवणारी देखील आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तो प्रकार देखील गोव्यात व्हावा ! यातून या प्रकरणाला आणखी गंभीर वळण प्राप्त झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article