For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याची आघाडीची मल्लखांबपटू : प्राजक्ता गावडे

06:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोव्याची आघाडीची मल्लखांबपटू   प्राजक्ता गावडे
Advertisement

नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा

Advertisement

शरीराला ताकद, लवचिकता व बौद्धिक उर्जा देणाऱ्या मल्लखांब या भारतातील प्राचीन खेळात आज युवा खेळाडू आकर्षित होताना दिसत आहे. प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालय हे मल्लखांबपटू घडविणारे गोव्याचे एक प्रमुख केंद्र आहे. या केंद्रात अनेक मल्लखांबपटू तयार झाले आहेत. याच केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आपेव्हाळ-प्रियोळ येथील प्राजक्ता वसंत गावडे या युवा खेळाडूने राज्य व देश पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. तिने अनेकवेळा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेतला असून सुवर्ण, रौप्य व कास्य पदके पटकावली आहेत.

2023 साली जयपूर राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत तिने शिवाजी विद्यापीठातर्फे खेळताना सुवर्णपदक, विशाखापटणम येथे झालेल्या दक्षिण विभागीय मल्लखांब स्पर्धेत रौप्य, 2013 साली तामिळनाडू येथे झालेल्या दक्षिण विभागीय मल्लखांब स्पर्धेत कास्य तसेच गोवा राज्य पातळीवरील 12 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. याशिवाय यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत, 2024 साली गोहाटी आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत, 2022 साली गुजरात येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच 2023 साली गोवा येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले.

Advertisement

25 वर्षीय प्राजक्ताने पाचव्या इयत्तेत असताना मल्लखांब खेळाला सुरुवात केली. विद्यालयातील शारीरिक शिक्षक लक्ष्मीकांत नाईक हे विद्यार्थ्यांना या खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक मुली या खेळात प्राविण्य मिळवित होत्या. त्यांना बघून प्राजक्ताने 2011 सालापासून मल्लखांब खेळाला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील प्रशिक्षक गणेश बोदाडे व सचिन चौधरी यांचे तिला प्रशिक्षण लाभले. सध्या ती प्रशिक्षक समीक्षा गावडे व प्रज्योत नाईक यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. 2012 सालापासून ती गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

2012 साली पुणे येथे झालेल्या स्पर्धेत, 2013 पु•gचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, 2014 पुणे, फोंडा गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच 2019 साली अमरावती महाराष्ट्र येथे झालेल्या पश्चिम विभागीय खेलो इंडिया ‘एक भारत श्रेष्ठ भारत मल्लखांब स्पर्धेत तिने सहभाग घेतला. गोवा मल्लखांब संघटनेचे आश्रयदाते मंत्री सुदिन ढवळीकर, अध्यक्ष मिथील ढवळीकर, अखिल भारतीय मल्लखांब फेडरेशनचे सचिव नारायण कुराडे व प्रशिक्षक समीक्षा गावडे यांचे आपल्याला सदैव मदत लाभल्याचे ती सांगते. खेळात सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांचा तिला पाठिंबा मिळत आहे.

शिक्षणातही उच्च पदवी

मल्लखांब खेळात बहुमुल्य योगदान देतानाच प्राजक्ताने शिक्षणातही उत्तम कामगिरी करून वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. दहावी पर्यंतचे शिक्षण तिने प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयातून घेतले. बारावी परीक्षा कुर्टी फोंडा येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयातून ती उत्तीर्ण झाली. फर्मागुडी फोंडा येथील जीव्हीएम गोविंद गोपाळ पै रायतूरकर वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉम झाल्यानंतर याच महाविद्यालयातून ती एम. कॉम. परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सध्या ती कुंडई येथील अर्काजा टॅक्नोलॉजिस या आस्थापनात अकाऊंट एसिस्टंट म्हणून काम करीत आहे.

‘मल्लखांब’ खेळ हा कुस्ती, जिम्नेस्टिक व योग यांचे मिश्रण आहे. व्यायामा व्यतिरिक्त हा खेळ आपल्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो. शारीरिक फायद्याबरोबरच ताकद, लवचिकता, संतुलन व समन्वय साधता येतो. युवा खेळाडूंनी या खेळात यावे व आपली प्रगती साधावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. भविष्यात ती मल्लखांब खेळाची प्रशिक्षक होणार असून पंच म्हणून कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे. यासाठी पंच परीक्षा देण्यासाठी ती तयारी करणार आहे.

Advertisement
Tags :

.