गोव्याची सागरी क्षेत्रात मोठी प्रगती
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मुंबईत भारतीय सागरी सप्ताह परिषदेचे उद्घाटन
पणजी : गोव्याने सागरी क्षेत्रात मोठी प्रगती केली असून अनेक पायाभूत सेवा, साधन - सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भारताच्या एकूणच सागरी ऐतिहासिक वारशाचा गोवा राज्य हा एक प्रमुख भाग असून ती ओळख अजूनही टिकवून ठेवली आहे. नवीन भारताच्या सागरी चेहऱ्यात गोव्याला महत्त्वाचे स्थान लाभेल. त्यामुळे गोव्याच्या सागरी क्षेत्रात अनेक गुंतवणुकीच्या संधी असून तेथे गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबई येथे सुरु झालेल्या भारतीय सागरी सप्ताह 2025 या परिषदेत केले.
‘महासागर एकत्रीकरण, सागरी दृष्टीकोन’ अशी त्या सागरी परिषदेची संकल्पना असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिचे उद्घाटन केले. डॉ. सावंत यांनी तेथे गोव्यासह भारताच्या नवीन सागरी भविष्याचा वेध घेतला. डॉ. सावंत पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सागरमाला आणि इतर विविध योजनांमुळे गोवा आता राष्ट्रीय सागरी नकाशावर महत्वाचे केंद्र उदयास आले आहे. त्यामुळे गोवा सागरी बंदर क्षेत्रात अनेक उद्योग वाढत असून गुंतवणूक होत आहे तसेच रोजगाराच्या संधी वाढत आहेत. गोव्याने सागरी क्षेत्रावर प्रामुख्याने भर देण्यास सुरुवात केल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
सागरी मार्ग सुरु करणार
गोव्यात सागरी मार्ग यांची जोडणी वाढवली जात असून काही सागरी मार्ग सुरु करण्याचा विचार चालू आहे. सागरी संरक्षण, सागरी संपत्तीचे संवर्धन, किनाऱ्यांची स्वच्छता याकडेही लक्ष देण्यात येत आहे. त्यांचा विविध प्रकारे विकास करण्यावरही भर दिला जात आहे. सागरी क्षेत्रात गोव्याने चांगली प्रगती साधल्याचा दावा डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणातून केला आणि त्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.