गोव्याचे मच्छीमारी खाते सुस्त
कर्नाटकातील ट्रॉलर्सकडून गोव्यात बेकायदा मासेमारी : तुम्हीच रोखा बेकायदा मासेमारी : मंत्री हळर्णकर
मडगाव : मलपे-कर्नाटक येथील सुमारे 300 ट्रॉलर गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोव्याच्या सागरी हद्दित घुसून बेकायदा मासेमारी करीत असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी बेतुल येथील मच्छीमार लवू केरकर व राजेंद्र केरकर यांनी केली आहे. मलपे येथील ट्रॉलरना खुद्द मलपे तसेच मंगळूर, होन्नावर, कारवार इत्यादी किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. जर त्यांनी बंदी असताना मासेमारी केली तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे हे ट्रॉलर गोव्याच्या हद्दित घुसून समुद्रकिनाऱ्याजवळ येऊन दोन दिवसांपासून मासेमारी करू लागल्याची माहिती राजेंद्र केरकर व लवू केरकर यांनी दिली आहे. सद्या हे ट्रॉलर आगोंद, पाळोळे व बेतूल परिसरात मासेमारी करीत आहेत. ते मुरगांव व तेथून पुढे केरी व मालपणपर्यंत मासेमारी करणार असल्याने त्यांच्यावर गोवा सरकारच्या मच्छीमारी खात्याने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
मोठ्या प्रमाणात पकडले तारले
मलपेच्या ट्रॉलरनी गोव्याच्या हद्दित घुसून मोठ्या प्रमाणात ‘तारले’ पकडल्याची माहिती केरकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून तारले मासळीचे गोव्याच्या समुद्रात आगमन झालेले आहे. मात्र, ज्या पद्धतीने मलपेचे ट्रॉलर मासेमारी करू लागले आहे ते पाहता गोव्यातील मच्छीमारांच्या जाळ्यात मासळी सापडणे कठीण होऊन बसणार असल्याची माहिती लवू केरकर व राजेंद्र केरकर यांनी दिली.
कारवाईसाठी यंत्रणाच नाही
मलपेचे ट्रॉलर गोव्याच्या हद्दित घुसून बेकायदा मासेमारी करीत असल्याची कल्पना मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना दिली असता, त्यांनी स्थानिक मच्छीमारांनीच त्यांना हाकलून लावावे अशी सूचना केली. सद्या राज्य सरकारच्या मच्छीमार खात्याकडे कारवाई करण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. किमान सागरी पोलिसांना कळवून या ट्रॉलर्सवाल्यांना रोखण्यासाठी काही करण्याचे सौजन्यही खात्याकडे नाही, याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर गोव्याचे मच्छीमार महाराष्ट्रात किंवा कर्नाटकाच्या हद्दित गेले तर त्यांच्यावर लगेच कडक कारवाई होते. मग, गोव्याच्या हद्दित घुसणाऱ्या ट्रॉलरवर मच्छीमार खाते का कारवाई करू शकत नाही असा सवालही केरकर यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या मच्छीमार खात्याने खोल समुद्रात गस्त घालण्याची गरज आहे. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यापूर्वी कोट्यावधी रूपये खर्च करून गस्त घालण्यासाठी बोट खरेदी केली होती. त्या बोटीचे काय झाले असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे.