‘कावी’च्या जीआय टॅगसाठी गोव्याचा पहिला अर्ज
गतवर्षीच सादर केल्याचा गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा दावा : आता अंतिम पात्रतेची प्रतीक्षा
पणजी : कावी कलेला जीआय टॅग मिळविण्यासाठी अर्ज करणारे कर्नाटक हे पहिले राज्य नसून त्यापूर्वीच म्हणजे वर्षभरापूर्वीच गोव्याने हा टॅग मिळविण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडून प्राप्त झाली आहे. जीआय टॅग हा उत्पादनाचे स्वदेशी मूळ आणि वेगळेपण स्थापित करतो. त्यात कावी कला ही मूळ गोमंतकीय असल्याचा दावा करून गतवर्षी 12 सप्टेंबर रोजी गोवा हेरिटेज अॅक्शन ग्रुप या नोंदणीकृत सोसायटीतर्फे अर्ज दाखल करण्यात आला होता.
खात्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जीआय-टॅग अर्जासाठी पूर्व-पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली असून जीआय नोंदणीद्वारे अंतिम पात्रतेची प्रतीक्षा करत आहे. गेल्या आठवड्यात विधानसभा अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी कावी कलेस जीआय टॅग मिळविण्यासाठी कर्नाटक सरकारने अर्ज केल्याचे निदर्शनास आणले होते. त्यांना मान्यता मिळाल्यास गोवा मागे पडणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.जीआय टॅग अर्ज प्रक्रियेत पेटंट सुविधा देण्यासाठी असलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकही जीआय टॅगसाठी अर्ज दाखल करू शकते. मात्र प्रत्यक्ष मान्यता कुणाला द्यावी हा निर्णय दोन्ही राज्यांकडून सादर झालेल्या कागदोपत्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणार आहे.
गोव्याकडे सबळ, ठोस पुरावे!
दोन्ही राज्यांनी स्वदाव्यांच्या समर्थनार्थ पुरेसे पुरावे सादर केले तर प्रसंगी दोन्ही राज्यांनाही टॅग देण्याचा विचार होऊ शकतो. अशावेळी कर्नाटकने कोणते पुरावे सादर केले आहेत ते आम्हाला माहित नाही. मात्र आमच्याकडे सबळ व ठोस पुरावे आहेत, असे संबंधित अधिकारी म्हणाला. गोव्याला आतापर्यंत दहा उत्पादनांसाठी जीआय टॅग प्राप्त झाले आहेत.