For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांबचा गोव्याचा चेहरा : समीक्षा गावडे

06:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांबचा गोव्याचा चेहरा   समीक्षा गावडे
Advertisement

नरेश गावणेकर

Advertisement

‘मल्लखांब’ या देशी व पारंपारिक खेळात गोव्यात प्रगती होताना दिसत असून युवा खेळाडू या खेळाकडे आकर्षित होत आहेत. खेळाच्या प्रसार व प्रचारासाठी काही खेळाडू झटताना दिसतात. समीक्षा तुकाराम गावडे ही युवा खेळाडू मल्लखांब खेळात बहुमूल्य योगदान देत असून एक खेळाडू व प्रशिक्षक म्हणून ती उत्कृष्ट कामगिरी बजावित आहेत. समीक्षाने राष्ट्रीय स्पर्धेत 28 वेळा राज्याचे प्रतिनिधीत्व केले असून 4 सुवर्ण व 9 कास्यपदके पटकावली आहेत. आपेव्हाळ, प्रियोळ - फोंडा येथील 27 वर्षीय समीक्षा गावडेने 2008 साली इयत्ता चौथीत असताना मल्लखांब खेळाला प्रारंभ केला. प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक लक्ष्मीकांत नाईक यांनी तिला या खेळात येण्यासाठी प्रेरीत केले. भुसावळ-महाराष्ट्राचे प्रशिक्षक गणेश बोदाडे व सचिन चौधरी यांचे तिला मार्गदर्शन लाभले. 2009 साली तिने राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत ती 14, 17 व 19 वर्षाखालील स्पर्धेत  सहभागी झाली.

शालेय शिक्षण तिने प्रियोळच्या स्वस्तिक विद्यालयात घेतले. 2014 साली ती दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली. उच्च माध्यमिक शिक्षण तिने कुर्टी फोंडा येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयात घेतले. खांडोळा सरकारी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन 2019 साली गोवा विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर गडहिंग्लज-कोल्हापूर येथील शिवराज महाविद्यालयात एम. कॉम. शिक्षण पूर्ण केले व शिवाजी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे मल्लखांब स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी तिने शिवराज महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. आंतर विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाने कास्यपदक पटकावले. हे यश मिळविण्यासाठी तिने उत्कृष्ट कामगिरी केली. यासाठी शिवराज महाविद्यालयातर्फे तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या या प्रगतीसाठी गोवा मल्लखांब संघटनेचे माजी अध्यक्ष तथा आश्रयदाते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे मार्गदर्शन, विद्यमान अध्यक्ष मिथील ढवळीकर, माजी सचिव नारायण कुराडे, आईवडील व कुटुंबीयांचे नियमित सहकार्य लाभले आहे.

Advertisement

युवा खेळाडूंना देतात प्रशिक्षणाचे धडे

एक खेळाडू म्हणून समीक्षा गोवा संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सध्या ती उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. खेळाचा प्रसार व प्रचार करण्याचा तिचा उद्देश आहे. मल्लखांब खेळ हा जिम्नेस्टिक, कुस्ती पकड व योग यांचे मिश्रण आहे. या खेळामुळे ताकद, लवचिकता, समन्वय व संतुलन साधण्याची कला अवगत होते. यासाठी युवा खेळाडूंनी या खेळात सहभागी व्हावे यासाठी ती प्रयत्न करीत आहे.

मल्लखांब अकादमी सुरु करणार

मुलींसाठी यापूर्वी फक्त दोरी मल्लखांब या प्रकारात स्पर्धा घेण्यात येत होती. मात्र आता त्यांना पोल मल्लखांब प्रकारातही सहभागी होता येणार आहे. गेली 17 वर्षे मल्लखांब हा तिच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. या खेळामुळे तिला एक दिशा मिळाली. या खेळातच ती आपली कारकिर्द घडविणार असल्याचे ती सांगते. या खेळातील उच्च पातळी तिने गाठली असून भविष्यात मल्लखांब अकादमी सुरु करण्याची तिचा प्रयत्न राहणार आहे.

Advertisement
Tags :

.