गोव्याची उदयोन्मुख कराटे खेळाडू : विशाका गावकर
श्रीलंका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक : दहाव्या वर्षी उत्तम प्रगती
‘मार्शल आर्ट’ ही एक प्राचीन युद्धकला असून ‘कराटे’ हा मार्शल आर्टचाच एक प्रकार आहे. कराटेपटूंचे दैवत असलेल्या ‘ब्रुस ली’ यांच्या चित्रपटामुळे अनेकांना कराटे शिकण्याची आवड निर्माण झाली. बायणे शिरोडा गोवा येथील विशाका वाटू गावकर या मुलीलाही कराटे स्पर्धा पाहून शिकण्याची इच्छा झाली. सहाव्या वर्षी तिने कराटे शिकण्यास सुरुवात केली व लगेच ती स्पर्धेत सहभागीही होऊ लागली. दहा वर्षीय विशाकाने आज राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन अनेक पदके मिळविली आहेत. श्रीलंका येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या ‘दक्षिण आशियाई युथ कराटे कप’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावून राज्य व देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली.
मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते. कराटेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य मिळते. आत्मविश्वास वाढतो. याच उद्देशाने विशाकाच्या आई वडिलानी तिला सहाव्या वर्षी कराटे प्रशिक्षण घेण्यासाठी शिरोडा स्कूल ऑफ कराटे वर्गात घातले. प्रशिक्षक रमाकांत गावकर व एडनी पिंटो यांच्या प्रशिक्षणाखाली ती कराटेचे धडे गिरवीत आहे. आज ती राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत असून यशाची पायरी चढत आहे.
विशाकाने श्रीलंका येथे जुलै 2025 मध्ये झालेल्या पहिल्या दक्षिण आशियाई युथ कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन कुमिते प्रकारात रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, भूतान, बांगलादेश व पाकिस्तान या देशातील कराटेपटूंचा सहभाग होता. नावेली सालसेत येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये यावर्षी झालेल्या आशिहरा अखिल भारतीय निमंत्रिताच्या कराटे स्पर्धेत सांघिक गटात सुवर्ण तसेच दहा वर्षांखालील गटात तिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. डेहराडून-उत्तरप्रदेश येथे झालेल्या केआयओ राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात कांस्यपदक प्राप्त केले. 2024 साली झालेल्या इंडो श्रीलंकन ओपन कराटे स्पर्धेत तिने कुमिते प्रकारात रौप्य पदक मिळविले. 2023 साली झालेल्या तिसऱ्या पश्चिम विभागीय कराटे स्पर्धेत विशाकाने सात वर्षाखालील गटात सुवर्ण व 25 कि. ग्रॅ. खालील गटात कास्य पदक पटकावले. डब्ल्यूएमएसकेएफ अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत काता प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावला. टीकेएजी दक्षिण जिल्हा कराटे स्पर्धेत तिने दहा वर्षाखालील गटात सुवर्ण, आठ वर्षाखालील कुमिते प्रकारात कास्य व काता प्रकारात सुवर्ण, 25 कि. ग्रॅ. खालील गटात सुवर्ण, नऊ वर्षाखालील काता प्रकारात कास्य तर 7 ते 9 वर्षाखालील काता प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.
दहा वर्षीय विशाका ही शिरोडा येथील श्रीमती कमलाबाई हेदे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. येथील शारीरिक शिक्षक विजय परुळेकर यांचेही तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे. ब्राऊन बेल्टधारक विशाका सायंकाळी कराटे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक रमाकांत गावकर व एडनी पिंटो तिच्याकडून योग्य मेहनत करवून घेत आहेत. तिची आई वंशिका व वडील वाटू यांच्या पाठबळामुळे ती या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावित आहे. कुठेही कराटे स्पर्धा असेल तर तिची आई तिला घेऊन जाते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, असे विशाका सांगते. शिक्षणातही विशाका हुशार आहे. शिक्षण व कराटे यांच्यात समतोल राखून पुढील वाटचाल करण्याचा तिचा निश्चय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदके प्राप्त करून गोव्याला लौकीक प्राप्त करून देण्याचा तिचा आत्मविश्वास आहे. भविष्यात कराटे प्रशिक्षक बनण्याची तिची मनीषा आहे.
- नरेश कृष्णा गावणेकर