गोव्याच्या सीमा अधिक सुरक्षित करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा दोडामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन
वार्ताहर/लाटंबार्से
गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असून पर्यटकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या पोळे, मोर्ले, केरी, पत्रादेवी तसेच गोवा दोडामार्ग या सीमा अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलीस, अबकारी आणि वाहतूक या तिन्ही यंत्रणा अधिक सक्षम करून सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा-दोडामार्ग पोलीस चौकीच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, पोलीस महासंचालक अलोक कुमार, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम खाते (इमारत) मुख्य अभियंता किशोर कोलवाळकर, कार्यकारी अभियंता पांडुरंग नाडकर्णी, वास्तूशिल्पकार प्रशांत देसाई, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच डॉ. रामा गावकर, डिचोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक अभियंता, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्याच्या गावांतील विकासकामांकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. गावांमध्ये चांगले प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे. पन्नास लाख खर्चून सुशोभीकरण करण्यात आल्याने इमारतीला आता झळाळी आली असून सुंदर दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीही चांगली सेवा बजावावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज तिचे उद्घाटन झाले, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. ग्रामपातळीचा विकास हा मुख्यमंत्र्यांमुळे होत आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सांगितले. सुशोभीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुऊवात करण्यात आली. सूत्रसंचालन तुळशीदास शिरोडकर यांनी केले, तर प्रदीप रेवोडकर यांनी आभार मानले.