गोवा पर्यटन हंगामास उत्साहात प्रारंभ
पहिले चार्टर विमान उतरले मोपावर
पणजी : यावर्षीच्या पर्यटन हंगामाला काल गुऊवारी उत्साहात सुऊवात झाली. रशियातील नोव्होसिबिर्स्क येथून आलेले पहिले चार्टर विमान मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. समईनृत्य, घोडेमोडणी, धनगरनृत्य, ब्रास बँड आणि फुलांनी स्वागत अशा विविध सादरीकरणांनी गोव्याच्या संस्कृतीचा आविष्कार पाहुण्यांसमोर घडविण्यात आला. पर्यटन संचालक केदार नाईक, उपसंचालक जयेश काणकोणकर, सहायक पर्यटन अधिकारी सौ. चित्रा वेंगुर्लेकर, कॉनकॉर्ड एक्झॉटिक व्हॉयेजेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शेख इस्माईल, मिनार ग्रुपचे उपाध्यक्ष शुबर्ट रेनाल्ड कोलासो यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत केले.
या हंगामात नोव्होसिबिर्स्कहून तीन नवीन साप्ताहिक फ्लाइट्स मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहेत. याशिवाय, येकाटेरिनबर्ग व मॉस्को येथून येणाऱ्या विद्यमान फ्लाइट्समुळे एअरोफ्लोटचे एकूण नऊ फ्लाइट्स दर आठवड्याला होणार आहेत. रशियाच्या पलीकडे, गोव्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे कारण कझाकस्तानहूनही चार्टर फ्लाइट्स 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत. या विस्तारित नेटवर्कमुळे वर्षाअखेरीस आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, स्थानिक व्यवसाय यांना चालना मिळून रोजगार आणि आर्थिक संधी वाढतील.