गोवा संघ 200 धावांनी मागे
वृत्तसंस्था / शिमोगा
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटक संघाविरुद्ध खेळताना गोव्याचा संघ 200 धावांनी पिछाडीवर आहे. कर्नाटकाने पहिल्या डावात 371 धावा जमविल्यानंतर गोवा संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 6 बाद 171 धावा जमविल्या.
या सामन्यात कर्नाटकाने 5 बाद 222 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली. करुण नायरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 267 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 174 धावा झळकविल्या. श्रेयश गोपालने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 57, विजयकुमार विशाखने 4 चौकारांसह 31, अभिनव मनोहरने 6 चौकारांसह 37, कर्णधार अगरवालने 4 चौकारांसह 28 धावा केल्या. श्रेयस गोपाल आणि नायर यांनी सहाव्या गड्यासाठी 117 धावांची शतकी भागिदारी केली. गोवा संघातर्फे अर्जुन तेंडुलकर आणि कौशिक यांनी प्रत्येकी 3 तर दर्शन मिसाळने 74 धावांत 2 आणि प्रभूदेसाईने 1 गडी बाद केला.
कर्नाटकाच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर गोव्याचा पहिला डाव गडगडला. त्यांचा निम्मा संघ 44 षटकात केवळ 100 धावांत तंबूत परतला. अर्जुन तेंडुलकर आणि मोहीत रेडकर या जोडीने संघाचा डाव थोडाफार सावरताना सातव्या गड्यासाठी अभेद्य 56 धावांची भागिदारी केली आहे. अर्जुन तेंडुलकर 1 षटकार आणि 5 चौकारांसह 43 तर मोहीत रेडकर 2 चौकारांसह 24 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी गोवा संघातील ललित यादवने 3 चौकारांसह 36, कर्णधार स्नेहल कवठणकरने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. कर्नाटकातर्फे अभिलाश शेट्टीने 63 धावांत 3 तर कवीरप्पाने 30 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: कर्नाटक प. डाव 371 (करुण नायर नाबाद 174, श्रेयस गोपाल 57, अभिनव मनोहर 37, विजयकुमार विशाख 31, अगरवाल 28, आंतर 22, अर्जुन तेंडुलकर व कौशिक प्रत्येकी 3 बळी, मिसाळ 2-74), गोवा प. डाव 77 षटकात 6 बाद 171 (अर्जुन तेंडुलकर खेळत आहे 43, रेडकर खेळत आहे 24, ललित यादव 36, अभिलाश शेट्टी 3-63, कवीरप्पा 2-30)