For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गोवा राज्य डुंबलेय शिमगोत्सवात!

06:12 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोवा राज्य डुंबलेय शिमगोत्सवात

गोवा राज्य म्हटले म्हणजे उत्सवांची मांदियाळी. या राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा बडगा आहे. या आचारसंहितेच्या जोडीलाच गोवा राज्यात शिमगोत्सवी राजवट सुरू झाली आहे. गोवा राज्य खऱ्या अर्थाने शिमगोत्सवात सध्या डुंबून गेले आहे.

Advertisement

पेडणेपासून काणकोणपर्यंत शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. काही भागात पाच तर काही ठिकाणी सात ते नऊ दिवस शिमगा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होळी पेटविल्यानंतर गावागावात ‘शबय, शबय’ व ढोल-ताशांच्या ‘घुमचे कटर घुम’ निनादासह शिमग्याचा उत्साह सुरू होतो. धुलीवंदन, चोरोत्सव, रोमट आदी पारंपरिक प्रकार त्या-त्या भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्या आहे. शिमगोत्सव म्हणजे जणू गोमंतकातील चालीरिती, रिवाजांचा, परंपरांचा उत्सव. राज्यात गावाबरोबरच गोवा सरकारचे पर्यटन खाते सार्वजनिक तालुक्याच्या ठिकाणी शिमगोत्सव गेली काही वर्षे साजरा करीत आहे. सरकारी शिमगोत्सवाच्या सोहळ्याला मंगळवार 26 पासून फोंडा तालुक्यातून प्रारंभ झाला. गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे हा सोहळा 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. कळंगुट, सांखळी, वाळपई, पर्वरी, डिचोली, काणकोण, पेडणे, वास्को, शिरोडा, कुडचडे, केपे, धारबांदोडा, मडगाव, म्हापसा, सांगे आणि कुंकळ्ळी येथे यंदा हा शिमगोत्सव होणार आहे. चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा आदी विविध स्पर्धांचीही यात रेलचेल असेल.

विविध पारंपरिक जती, ढोल-ताशांच्या गजरात गेल्या मंगळवारी फोंडा शहर दुमदुमून गेले. शिमगोत्सवाचे पहिले नमन मंगळवारी अंत्रुज महालात मोठ्या उत्साहात झाले व राज्यातील सार्वजनिक शिमगोत्सवाला दिमाखात सुऊवात झाली. पुढील पंधरा दिवस शिमगोत्सवाचा हा जल्लोष गोव्यातील सर्व तालुक्यामध्ये चालणार आहे.

Advertisement

भव्य रोमटामेळ, लोकनृत्य सादरीकरण व स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांचा यंदाही वाढता सहभाग फोंड्यात दिसून आला. रामायणापासून महाभारत पौराणिक दृश्यांवर आधारित अनेक स्वयंचलित देखावे होते. पर्यावरणावर आधारितही विविध देखावे सादर करून पर्यावरण जतनाचा संदेश दिला. नकलाकार व वेशभूषा कलाकारांनी पारंपरिक वेश व पौराणिक व्यक्तीरेखांची वेशभूषा साकाऊन लोकांचे मनोरंजन करीत मिरवणुकीची रंगत वाढविली. पारंपरिक रोमटामेळांमध्ये सर्व वयोगटातील कलाकारांचा अबाल-वृद्धांपासून सहभाग प्रकर्षाने जाणवला.  लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मिरवणुकीवर वेळेचे निर्बंध असल्याने सध्या कलाकारांमध्ये नाराजी आहे. शिमगोत्सव म्हणजे गोव्याच्या जीवनाची आणि परंपरांची झलक देतो. गोव्याला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटकही या शिमगोत्सवात सहभागी होऊन शिमगोत्सवाचा आनंद लुटतात.

Advertisement

गोमंतकीय शिमगोत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. याद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. दरवर्षी गोव्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होणारे चित्ररथ रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. बेधुंद नृत्य करणारी रोमटामेळ पथके, लक्षवेधी घोडेमोडणी नृत्य, पथकाच्या पोषाखातील विविधता आदींमुळे हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटतो. गोव्याची पारंपरिक वेशभूषा, विविध पौराणिक कथानकांवर आधारित चित्ररथ व हलते देखावे यामुळे रसिकांना गोव्याची संस्कृती व लोककलेचे दर्शन घडते. गोव्याची लोककला मनाला भुरळ घालणारी आहे. लोककला ही केवळ कला नसून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन देणारी आहे. शिमगोत्सव म्हणजे लोकगीत, लोकसंगीत, ऐतिहासिक वारसाची महती सांगणारा त्याचप्रमाणे परंपरेने जोपासलेला लोकविश्वास, श्रद्धा यांच्या बळावर आजवर टिकून असलेल्या शिमगोत्सवाची रुपे अनंतकाळपर्यंत टिकावीत व भावी पिढीला त्याची ओळख घडावी, या हेतूने हे संचित जपणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे.

शिमगोत्सव काळात डिचोलीतील बोर्डे, पिळगाव, कुडणे, कारापूर आदी काही ठराविक भागात पारंपरिक पद्धतीने गडे उत्सव साजरा होतो. साळ गावातील गडे उत्सव प्रसिद्ध आहे. या गडे उत्सवाला नावलौकिक प्राप्त झाला आहे. गेले तीन दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शिमगोत्सवात काही भागात पारंपरिक लोकनृत्य असलेल्या घोडेमोडणी प्रकारामध्ये लोककलेचे दर्शन घडते. गोफ, धनगर नृत्य, घोडेमोडणी, समई नृत्य, मोरूलो आदी पारंपरिक नृत्य याचेही दर्शन या शिमगोत्सवात घडते. शिमगोत्सव हा खऱ्या अर्थाने राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत खोलवर ऊजलेला सण, जीवन, परंपरा आणि आध्यात्मिक उत्सव आहे. या शिमगोत्सवाचा प्रसार, प्रचार होण्याच्यादृष्टीने गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने याला पाठिंबा दिला आहे. गोव्याच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यामुळे होणार आहे.

गोवा म्हटले म्हणजे जणू ‘खा, प्या मजा करा’ अशी ओळख. गोव्याला समुद्रकिनाऱ्यावरील संस्कृती असल्यामुळे संगीत रजनी, पार्ट्यांचा सुकाळ, अंमलीपदार्थ व्यवसाय, मद्यालये आदी बाबींमुळे ही ओळख निर्माण होणे साहजिकच आहे. या पलीकडेही या ठिकाणी संस्कृती नांदते, हे जगासमोर सिद्ध करणे आज गोमंतकीयांची जबाबदारी आहे. अशाप्रकारच्या शिमगोत्सव उत्सवातून हे सहज शक्य आहे. किनारी संस्कृतीमुळे बदनाम झालेले गोव्याचे नाव आज सुधारण्याची गरज आहे. गोवा ही भोगभूमी नसून ती देवभूमी, संतभूमी, योगभूमी आहे. हे साऱ्या जगाला पटवून देण्याची जबाबदारी आज गोमंतकीय कलाकारांची तसेच गोवा सरकारचीही आहे. त्यामुळे शिमगोत्सव व गोव्यातील अन्य पारंपरिक उत्सवांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य यांनी हल्लीच गोवा राज्यात ‘आध्यात्मिक महोत्सव’ घडवून आणून गोव्याची बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत. गोवा राज्यातही आध्यात्मिक पर्यटन सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलून दाखविला आहे. त्यांचे हे प्रयत्न फलदायी ठरोत, अशी अपेक्षा करूया.

गोव्यातील किनाऱ्यांवर डीजेच्या तालावर केवळ नंगानाच होत नाही तर याठिकाणी फुगडी, भजन, नाटके, तियात्र, धालो, ओव्या तसेच संस्कृतीप्रधान सण, उत्सवही होतात. गोमंतकीय संस्कृतीचा उदोउदो होतो, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. अंमलीपदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या, पाश्चात्य संस्कृतीचा उदोउदो करणाऱ्यांना आता गोमंतकीय संस्कृतीचा डोस पाजण्याची नितांत गरज आहे. शिमगोत्सव, नाटके तसेच अन्य लोकसंस्कृती जपणारे उत्सव गोवा राज्यात टिकले तरच गोंयकारपण खऱ्या अर्थाने शाबूत राहणार आहे. हे संचित जपण्यासाठी सरकारने तसेच विविध क्षेत्रातील गोमंतकीय कलाकारांनी आतापासूनच कार्यरत राहणे गरजेचे आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :
×

.