For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा अपघातमुक्त, प्रदूषणमुक्त रहावा

12:34 PM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोवा अपघातमुक्त  प्रदूषणमुक्त रहावा
Advertisement

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे गोवेकरांना आवाहन: मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाचे लोकार्पण : निसर्गाचे संवर्धन आवश्यक

Advertisement

वास्को : गोव्यात वाहतूक साधनसुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अनेक विकास प्रकल्प मार्गी लागत आहेत. भविष्यातही महामार्ग विकासाचे प्रकल्प होतील. मात्र निसर्गाचे संवर्धन करूनच हे प्रकल्प व्हायला हवेत. रस्ते व महामार्ग विकास होत असला तरी अपघातांची संख्याही वाढत असून गोवा हा अपघातमुक्त आणि प्रदूषणमुक्तही राहायला हवा, याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी. येणाऱ्या काळात देशातील समृध्द राज्य म्हणून गोवा पहिल्या पाच राज्यांमध्ये निश्चितच झळकेल, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वास्कोत आयोजित केलेल्या मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या लोकापर्ण सोहळ्यात केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. बायणातील महामार्गावर काल संध्याकाळी उशिरा हा सोहळा पार पडला. गडकरींनी या सोहळ्यात गोव्यातील जवळपास साडेतीन हजार कोटींच्या अन्य पाच महामार्गांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही केली. यावेळी त्यांनी गोवा राज्य विकसीत वाहतूक सेवेचा लाभ घेताना अपघात आणि प्रदूषणमुक्त व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली. गोव्यात पूर्ण झालेली महामार्गांची विकासकामे, होऊ घातलेली विकासकामे आणि भविष्यात होणाऱ्या तसेच विचाराधीन असलेल्या महामार्ग प्रकल्पांचीही माहिती दिली.

Advertisement

पर्यावरणाचे संरक्षण करूनच विकास व्हायला हवा, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, कायदामंत्री आलेक्स सिकेरा, सभापती रमेश तवडकर, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, आमदार उल्हास तुयेकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार तसेच मुरगावचे नगरसेवक उपस्थित होते.

गोव्याला सुसह्या ठरणारा विकास

केंद्रीयमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, गोव्यात झालेला व होत असलेला महामार्गांचा विकास जनतेचे जीवन सुसाहाय्य करणार आहे. मुरगाव बंदराला जोडण्यात आलेला महामार्ग बंदराच्या उद्योग विकासासाठी निश्चितच साहाय्यभूत ठरेल. मुरगाव बंदराला विकासाच्या फार मोठ्या संधी आहेत. राज्य सरकारने रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणे ओळखावीत आणि उपाययोजना कराव्यात. महामार्गाच्या दुभाजकांमध्ये जागेत वृक्षारोपण करावे. त्यामुळे रस्त्यांचे सौदर्यीकरण होईल. काही महामार्गांवर सरकारी अतिक्रमणे झालेली आहेत, त्यांना नोटिसा पाठवा. आवश्यकता भासल्यास ती हटवण्याची व्यवस्था आम्ही करु, असे गडकरी म्हणाले.

झटपट विकासासाठी गडकरींच्या राज्यसरकारला सूचना

गडकरींनी यावेळी बोलताना राज्य सरकारलाही काही सूचना केल्या. पर्वरीत महामार्गाचे काम चालू आहे. या कामात अडचणी येत आहेत. त्या सरकारने दूर कराव्यात. नियोजित महामार्ग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जमिनी संपादीत कराव्यात, असे सांगितले. झुआरी नदीवर होणाऱ्या मनोऱ्यावरही गडकरी बोलले. ते म्हणाले की राज्य सरकार डोलत डोलत चालत आहे. त्यामुळे 270 कोटींचा हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. सरकारने तुतारी वाजवावी व कामाला गती द्यावी अशी सूचना त्यांनी केली. झुआरी नदीवरील प्रकल्प हा पर्यटन प्रकल्प असून तो गोव्यासाठीच नव्हे तर जगासाठी आकर्षण केंद्र बनणार आहे. झुआरी किनाऱ्याचा विकास होणार आहे. त्या समुद्रात बोटींग व्यवसाय सुरू होईल. पर्यटनावर आधारीत अनेक व्यवसाय सुरू करता येतील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होती असे गडकरी म्हणाले.

गोव्यासाठी समांतर महामार्ग आवश्यक

गडकरींनी आपल्या भाषणात गोव्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढवा घेतला.  आतापर्यंत पूर्ण झालेले विविध महामार्ग प्रकल्प, होऊ घातलेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्पांविषयीही ते बोलले. या विकासाबरोबरच गोव्यात गावांगावांतून जणारा समांतर महामार्ग होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. 120 किलोमीटर अंतराचा हा महामार्ग विचाराधीन आहे. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यास गोवा अधिक सुसह्या होईल. राज्य सरकारने या प्रकल्पातील अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करावेत. आतापर्यंत गोव्याने चांगल्या पध्दतीने विकास केलेला असून पुढेही विकास होईल. येणाऱ्या काळात गोवा राज्य देशातील पहिल्या पाच समृध्द राज्यांच्या यादीत असेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

विकासाची संकल्पना गडकरींची : मुख्यमंत्री

गोव्यात विमानतळ, रेल व रस्ता एकमेकांना जोडण्याचा विकास ही केंद्रीयमंत्री नितीन गडकरीचींच संकल्पना असून गोव्याच्या विकासाची संकल्पना गडकरीनीच देशाच्या वाहतुकमंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर केली होती अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, गडकरींमुळे खऱ्या अर्थाने कनेक्टिविटी निर्माण झालेली आहे. मनोहर पर्रीकरांच्या मनातील विकास गोव्यात कायम राहिलेला आहे. 2600 कोटी हा गोव्याचा अर्थसंकल्प आहे. मात्र, केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या अकरा वर्षांत 40 हजार कोटींचा विकास गोव्याने साधलेला आहे. त्यापूर्वी 400 कोटीही मिळत नव्हते. केंद्राने गोव्याला कधी ना म्हटलेले नाही. मेदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गोव्याला हा विकास दिलेला आहे. गोव्यात समांतर महामार्गही होईल. अडचणींवर मात करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच राज्यात जलमार्ग आणि रेलमार्ग जोडले जातील. मेट्रो रेलचाही विचार सरकार करीत आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी मुरगाव बंदराच्या विकासालाही प्राधान्य दिले. बंदरातील व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. गोव्याला रस्ते आणि महामार्ग नव्हे तर सर्वच क्षेत्रांचा विकास महत्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले. या सोहळ्यात मंत्री माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर यांचीही भाषणे झाली. गोव्यातील जनता केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचे सदैव ऋणी असतील. त्यांचे पाय धरावे असे कार्य गडकरींनी गोव्यासाठी पेलेले आहे असे मंत्री गुदिन्हो यावेळी म्हणाले. गडकरींनी गोव्यातच नव्हे तर देशात आपल्या कार्याने चमत्कार घडवला आहे असे ते म्हणाले.

लोकापर्ण, पायाभरण करण्यात आलेले महामार्ग

रवींद्रभवन ते एमपीटी गेट क्र. 9 पर्यंतच्या 644 कोटींच्या पोर्ट कनेक्टिव्हीटी  फ्लाय ओव्हरसह केबल स्टेड उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटनासह सुमारे 3500 कोटींच्या इतर पाच प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते डिजीटल माध्यमातून करण्यात आली. मुरगांव बंदराला जोडण्यासाठी उभारण्यात आलेला केबल स्टेड उड्डाणपूल हा देशातील पहिलाच वक्रकार पूल आहे. रेल्वे उड्डाणपूलावरच हा पूल उभारण्यात आला आहे. यात एमईएस महाविद्यालय ते बोगमाळो जंक्शनपर्यंत फ्लायओव्हर (472 कोटी), जुवारी ते मडगाव बायपासपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण (398 कोटी), नावेली ते कुंकळ्ळी रस्त्याचे चौपदरीकरण (747 कोटी), बेंदोर्डे ते पोळे पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण (1376 कोटी) व फोंडा ते भोमा रस्त्याचे चौपदरीकरण (557 कोटी)  या प्रकल्पांचा समावेश असून या सहा महामार्ग प्रकल्पांचे एकूण अंतर  50 किलोमीटर आहे.

Advertisement
Tags :

.