सोशियल मीडियावरुन गोव्याची बदनामी करू नये : मुख्यमंत्री
पणजी : गोवा हे पर्यटन राज्य असून गोव्याची बदनामी कोणी करू नये. सोशल मीडियातून काहीजण गोव्याचे नाव खराब करतात. ते त्यांनी थांबवावे त्याशिवाय गोव्यातील पर्यटन वाढीसाठी त्यांनी मदत करावी. पर्यटन वाढीकरीता जे काही बदल करायचे असतील तर ते येत्या पावसाळी अधिवेशनात होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.पर्यटनाशी संबंधित विविध उद्योग, व्यवसाय प्रतिनिधींची पर्यटन खात्यातर्फे बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. सावंत हे उपस्थित होते. सर्वांनी पर्यटनक्षेत्रातील आपापल्या समस्या डॉ. सावंत यांच्यासमोर मांडल्या अनेकांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या सर्वांचे म्हणणे डॉ. सावंत यांनी प्रथम ऐकून घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोव्याचे काही पर्यटनाचे विषय केंद्र सरकारशी संबंधित असून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच पर्यटनाचे सर्व परवाने एकाच ठिकाणी मिळावेत म्हणून एक खिडकी योजना (सिंगल विंडो) राबवण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. देशात-परदेशात गोव्याची वाहतूक जोडणी (पर्यटन) वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून विविध विमान कंपन्या राज्य, विविध देशांतील सरकार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या सदर बैठकीत पर्यटन मंत्री रोहन खवंटे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकर, तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था-संघटना, उद्योग- व्यवसाय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.