क्रूझ पर्यटन विकासात गोव्याला महत्वाचे स्थान
केंद्रीय जहाजोद्योगमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन
वास्को : सागरी आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारने नियोबद्ध कार्यक्रम आखलेला असून मागच्या दहा वर्षांत देशाने या क्षेत्रात भरीव विकास साधलेला आहे. येणाऱ्या काळात सागरी आर्थिक विकासात भारत देश जगात आघाडीवर असेल, असा विश्वास केंद्रीय जहाजोद्योगमंत्री सर्बांनंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. क्रूझ पर्यटन विकासाच्या दृष्टीने देशातील बंदरांचा विकास करण्यात येत असून त्यात गोव्याला महत्वाचे स्थान आहे, असेही केंद्रीयमंत्री सोनोवाल म्हणाले. सागरी राज्य विकास परिषदेनिमित्त काल गुरुवारी गोव्यात दाखल झालेल्या केंद्रीयमंत्री सोनोवाल यांनी मुरगाव बंदरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशातील सागरी क्षेत्रातील आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिली.
दहा वर्षांत सागरी आर्थिक विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षांत देशाने सागरी आर्थिक क्षेत्रात भरीव विकास साध्य केलेला आहे. या क्षेत्रातील व्यापार उद्योगात भारताची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उद्योग व्यापाराचा दर्जाही वाढलेला आहे. बंदरांमध्ये माल हाताळणीची क्षमता वाढली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सागरी आर्थिक विकासासाठी संयुक्तरित्या कार्यरत आहेत. खासगी क्षेत्रातील उद्योगांचेही सहकार्य लाभत आहे. भविष्यात अधिकाअधिक प्रगती होत राहील. आपणास विश्वास वाटत आहे की येणाऱ्या काळात भारत देशत सागरी आर्थिक विकासात जगात आघाडीवर असेल, असे सोनोवाल म्हणाले.
गोव्यासह देशात क्रूझ पर्यटनाला प्रोत्सान
देशात क्रूझ पर्यटनाचा विकास होत आहे. गोवा राज्य देशात आणि जगात सर्वांना आवडणारे पर्यटनस्थळ असून गोव्यात येणाऱ्या क्रूझ पर्यटकांच्या चांगल्या सोयीसाठी सरकार इथल्या सोयीसुविधा वाढवत आहे. प्रवासी हाताळण्यासाठी क्षमता वाढवत आहे. गोव्याप्रमाणेच मुंबई, न्यू मँगलोर, कोचिन, चेन्नई, विशाखापट्टणम येथील बंदरातही क्रूझ पर्यटक टर्मिनल प्रकल्प उभारण्यात येत आहे. गोव्यातला क्रूझ टर्मिनल लवकरच पूर्ण होईल. तसेच कोलकाता, सोमनाथ, कोनार्क या प्रदेशातही पर्यटक टर्मिनल उभारण्यात येईल अशी माहिती केंद्रीयमंत्र्यांनी दिली. गेल्या दहा वर्षांपासून होत असलेल्या पर्यटन विकासामुळे जागतिक पर्यटक मोठ्या प्रमाणात भारतात येतील. 2030 सालापर्यंत देशात सागरीमार्गे 15 लाख जागतिक पर्यटक दाखल होतील असे लक्ष्य आम्ही ठेवलेले आहे. त्यासाठी नियोजनबध्द विकास करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्र्यांनी दिली. यावेळी एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार उपस्थित होते.