गोव्याच्या खेळाडुंनी लुटलं सोनं
एकाच दिवसात मिळविली 13 सुवर्णांसह 35 पदके
मडगाव : राज्यात सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने काल बुधवारी स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजविले. काल एकाच दिवशी स्क्वे मार्शल आर्ट, बॉक्सिंग आणि यॉटिंग क्रीडा प्रकारात गोव्याने पदके प्राप्त केली. गोव्याच्या पदकांची संख्या आता एकूण 86 झाली आहे. स्पर्धेचा एक दिवस शिल्लक असून पदकतालिकेत ‘टॉप टेन’मध्ये येण्यासाठी यजमान गोवा प्रयत्नशील आहे. गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कालचा दिवस चांगला गेला. एकूण 33 पदकांची लयलूट गोव्याच्या अॅथलेट्सनी केली. फातोर्डा येथील इनडोअर स्टेडियममध्ये गोव्याच्या स्क्वे मार्शल आर्टच्या स्क्वेपटूंनी तर 22 पदके प्राप्त केली. यापुर्वी पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या गोव्याच्या सॅपेकटॅकरो संघाने एकाच दिवशी 6 सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला होता, तो काल फातोर्डा इनडोअरवर स्क्वेपटूंनी आठ सुवर्णपदके मिळवित मोडित काढला.
स्क्वेपटूंनी 8 सुवर्ण व 8 रौप्य तसेच 5 कास्यपदके मिळविली. यजमान गोव्याच्या नावावर स्पर्धेच्या समाप्तीच्या आदल्या दिवशी एकूण 86 पदके आहेत. यात 25 सुवर्ण, 25 रौप्य आणि 36 कास्यपदकांचा समावेश आहे. कालचा दिवस हा गोव्याच्या नावावर असेल हे निश्चित होतेच. 6 बॉक्सिंगपटूंची अंतिम फेरी तसेच स्क्वे मार्शल आर्टच्या अंतिम फेरीतील विविध वजनगटात डझनभर स्पर्धक असल्याने गोव्याचे यश निश्चित होते. या यशाचे गोव्याने सोन्यात रूपांतर केले व आपल्या 12 सुवर्णांना आणखी 13 सुवर्णपदके जोडली. याव्यतिरिक्त गोव्याने 13 रौप्य व 9 कास्यपदकेही आपल्या पदकतालिकेत जोडली. पेडे मैदानावर बॉक्सिंग बाऊटमध्ये गोव्याने प्रत्येकी 3 सुवर्ण, रौप्य व कास्यपदके अशी 9 पदके जिंकली तर यॉटिंगमध्ये कात्या आणि डेन कुयेल्होने सुवर्णवेध साधला तर पर्ल कोलवाळकरने ब्राँझपदक जिंकून या सागरी साहसी खेळावर आपलं वर्चस्व मिळविले.