‘गोवा माईल्स’ काऊंटर बंद करणार नाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण : आंदोलक टॅक्सीचालकांची प्रमुख मागणी अमान्य
पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘गोवा माईल्स’ टॅक्सी काऊंटर बंद केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे बजावले आहे. पेडण्यातील टॅक्सीमालक आंदोलकांच्या शिष्टमंडळाने काल सोमवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर सहा मागण्या मांडल्या होत्या, त्यातील पाच मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून एक मागणी फेटाळली आहे. तसेच आंदोलकांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही केले आहे. पर्वरी येथे मंत्रालयात स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत पेडण्यातील टॅक्सी मालकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी अडीज तास बैठक झाली. आपल्या विविध मागण्यांसाठी पेडणे येथे गेल्या काही दिवसांपासून संप करीत असलेल्या पेडण्यातील टॅक्सी मालकांची शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांकडे बैठकीची पहिली फेरी झाली होती. त्यानंतर काल सोमवारी मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी पुन्हा पणजीत बोलविले होते.
गोवा माईल्सकडून सरकारला लाभच
बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की टॅक्सी मालकांनी मांडलेल्या सहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य केल्या आहेत. आंदोलन मागे घेण्यास त्यांनी होकारही दिलेला आहे. त्यानुसार आता त्यांनी संप मागे घ्यावा. राज्यात गोवा माईल्स आणि एग्रीगेटर सुऊ करणे हा धोरणात्मक निर्णय होता. ही कंपनी चांगल्या प्रकारची, दर्जेदार सेवा देत आहे. गोवा माईल्समध्ये सरकारने कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, उलट ही कंपनी सरकारला जीएसटीच्या स्वऊपात महसूल देते. त्यामुळे गोवा माईल्स बंद करणे शक्य नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
टॅक्सीमालकांनी मांडल्या अनेक मागण्या
मनोहर इंटरनॅशनल विमानतळावर स्थानिकांना टॅक्सी काऊंटर मोफत द्यावा, पार्किंग शुल्काबाबत फेरविचार करावा, विमानतळावर सर्व प्रकरच्या खाजगी टॅक्सी, खाजगी भाडेसेवा, कॅब भाड्याने देणे बंद करावे, विमानतळावरील सध्याचा रस्ता स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी खुला ठेवावा, टॅक्सी चालकांसाठी लिंक रोडवर टोल आकारला जाऊ नये, तसेच विमातळावरील गोवा माईल्सचा काऊंटर हटवावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
जोपर्यंत सरकारकडून लिखित स्वरूपात पाचही मागण्या आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा ठाम निर्धार पेडणे येथे टॅक्सी व्यवसायिकांच्या पाचव्या दिवसाच्या काल सोमवारच्या आंदोलनात करण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन आता मंगळवारी सुरू राहणार असे चित्र होते. यावेळी बोलताना टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत म्हणाले की गेले पाच दिवस हे आंदोलन सुरू आहे. सरकार वेळोवेळी आम्हाला झुलत ठेवते. आम्ही सहा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या, त्यातील पाच मागण्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लिखित स्वरूपात त्याबाबत आम्हाला अजून काही दिले नाही. संघटनेचे आनंद गावस म्हणाले की गेले पाच दिवस आम्हाला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळाले नाही. आम्ही या ठिकाणी कशा परिस्थितीत राहतो हे वर्तमानपत्रांतून सरकारला, गोव्याच्या जनतेला कळाले आहे.