बेळगुंदी फाट्यावर गोवा बनावटीची दारू जप्त
3 लाख रुपये किमतीचा ऐवज ताब्यात : सीसीबी पोलिसांची कारवाई
बेळगाव : गोव्याहून बेळगावला बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 3 लाख रुपये किमतीची 468 लिटर 480 मिली दारू जप्त केली आहे. उचगावहून बेळगावला येताना बेळगुंदी क्रॉसवर ही कारवाई करण्यात आली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, एस. सी. कोरे, आय. एस. पाटील, एस. बी. पाटील, एम. एस. पाटील, जगदीश हादिमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अबकारी विभागाबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनीही बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मंजुनाथ गिडीगेरी (वय 26), युवराज नायक (वय 22, दोघेही रा. महाद्वार रोड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काकती पोलीस स्थानकात या दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तवेरा वाहनातून गोवा बनावटीची दारू बेळगावला आणण्यात येत होती. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.