माजी उत्पादन शुल्क मंत्र्याच्या जिल्ह्यात खळबळ, 1 कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची तब्बल 1 कोटी 91 लाख रुपये किमतीची दारू जप्त केली
सातारा : माजी उत्पादन शुल्क मंत्र्याच्या जिल्ह्यात एक कोटी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी बोरगाव गावच्या हद्दीत ही कारवाई केली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची तब्बल 1 कोटी 91 लाख रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.
सातारा शहराजवळ असलेल्या बोरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ही कारवाई करत दारू वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी सचिन विजय जाधव (रा. आळसंद ता. खानापुर जि. सांगली), जमीर हरुण पटेल (रा. आगाशिवनगर मलकापूर ता. कराड जि. सातारा) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ट्रकमधून बनावट दारू वाहतून केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकास संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. हा ट्रक त्या भागात आल्यानंतर पोलीसांनी ट्रक अडवून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना हा मुद्देमाल मिळाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांनी उत्पादन शुल्क मंत्री असताना गोवा बनावट दारू सापडली तर मोक्का लावणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे ही कारवाई जर पोलीस करत असतील, तर साताऱ्याच्या उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्यावर काय कारवाई होणार? त्यांना निलंबित केले जाणार का?
ट्रक चालक व क्लीनर सापडला आहे तर यामागील "मुख्य आका" कोण यांचा का उलघडा झाला नाही? गुन्हा दाखल करतानाच त्याला मोक्का का लावला नाही? असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. जरी आत्ता शंभूराजे देसाई उत्पादन शुल्क मंत्री नसले तरी ते विद्यमान पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याच आदेशाला त्यांच्याच जिल्ह्यात केराची टोपली दाखवली जाणार का असा अंदाज व्यक्त केला जात आहे.