प्रभू रामचंद्रांच्या स्वागतास गोवा सज्ज
सर्वत्र जय जय श्रीरामचा नारा : सारा माहोल भगवामय, राममय
पणजी : अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण देशासह गोवा राज्यही राममय झाले आहे. विविध धार्मिक विधीसाठी जनता सज्ज झाली असून आज सोमवार 22 जानेवारी रोजी पहाटेपासूनच सर्व गावागावातील मंदिरांमध्ये भरगच्च कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. शहरांसह गावांतील अनेक रस्ते भगव्या पताका, श्रीरामांच्या प्रतिमा यांनी सजले असून विविध देवळातून भजन, कीर्तन, दीपोत्सव चालू झाले आहेत. काल रविवारच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीच्या मिरवणुका काढण्यात आल्या.
सारा परिसर भगवामय
आजही बहुतेक सर्वच मंदिरांमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. मंदिरांवर, रस्त्यांवर अनेक जागांवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे फलक लागले असून घराघरांवर श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेसह भगवे ध्वज अन् विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सायंकाळी पणत्या तसेच गोव्याचे पारंपरिक आकाशकंदील पेटवून दिवाळी साजरी केली जाणार आहे. एकंदरीत सर्वत्र उत्साह, भक्तीमय वातावरण व दिवाळीचा आभास दिसून येत आहे. रामरक्षा, रामजप, पूजा-अर्चा, अभिषेक, दीपोत्सव, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, आरती-महाआरती यांचा समावेश आहे.
मंदिर समित्यांचे कार्यक्रम
प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिष्ठापना अयोध्येत होत असली तरी सर्वसामान्य जनतेला तेथे जाणे अशक्य असल्यामुळे त्याचा आनंद गोव्यातच साजरा करण्याचे ठरविले आहे. विविध मंदिरांच्या समित्यांनी आपापल्या गावात आनंदोत्सव साजरा करावा म्हणून विविध कार्यक्रम आखले असून त्यांची कार्यवाही गावागावातून सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घेतला असून सोमवारच्या दिवशी (आज) मद्य, मासळी, चिकन, मटण व इतर मांसाहारी आहारावर, खरेदी-विक्रीवर स्वत:हून बंदी घातली आहे.
आज सर्वांनाच सुट्टी
राज्य सरकारतर्फे आज 22 जानेवारी रोजी अयोध्या प्रभू राम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी एका आदेशान्वये राज्य सरकारने फक्त सरकारी कार्यालये, शाळा यांनाच सुटी जाहीर केली होती. त्यात आता बदल करून सरकारने नव्याने आदेश जारी करून सर्व बँका, इतर खासगी आस्थापने अशा सर्वांसाठी सार्वजनिक सुट्टी दिली आहे.
राज्यभरात दुसरी दिवाळी
गोव्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गावागावांनी रस्त्यांवर, घरांवर, मंदिरांवर भगवे ध्वज फडकावण्यात आले असून अनेक ठिकाणी भगव्या पताकांची आरास, सजावट करण्यात आली आहे. गृह सोसायट्या, मंदिर समित्या, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच विविध समाजातर्फे राममंदिर उद्घाटनाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा करणार आहेत. अनेकांनी रामाचा पोशाख करून मिरवणुका फेरीत सहभाग घेतला असून एकंदरीत गोव्यातील शहरे, गावे भगवेमय झाली आहेत. अनेक मंदिरातून मोठी पताकांची सजावट, रांगोळी सजावट करण्यात आली असून पर्वरी ते पणजी हा रस्ता (हाय वे) रंगीबेरंगी कापडे, आकाशकंदील यांच्या देखाव्याने रंगून गेला आहे. संपूर्ण राज्यात राममंदिर उद्घाटनास भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सायंकाळी सांताव्रुझ मतदारसंघ भाजप, बजरंग दल, युनायटेड सांताव्रुझ यांच्यातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. चिंबल येथून सुरु झालेली ही मिरवणूक मेरशी, कलापूर, पणजी, ताळगावपर्यंत गेली. मिरवणुकीत लहामोठ्यांसह वृद्ध, ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. जय श्रीरामांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता.